पुणेकरांनी दिल्लीची ‘दबंगगिरी’ उतरवली
By admin | Published: February 4, 2016 03:40 AM2016-02-04T03:40:59+5:302016-02-04T03:40:59+5:30
पुणेरी पलटणने उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात दबंग दिल्लीला ३८-२० असे लोळवले. यासह पुणेकरांनी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली
बंगळुरु : पुणेरी पलटणने उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात दबंग दिल्लीला ३८-२० असे लोळवले. यासह पुणेकरांनी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली असून दिल्लीकरांना मात्र सलग तिसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले. तत्पूर्वी पटणा पायरेट्सने सलग दुसरा विजय नोंदवताना बंगळुरु बुल्सला ३३-२४ असे नमवले.
श्री कांतीरवा स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात पुणेकरांनी सुरुवातीपासूनच आक्रमक हल्ला चढवत दिल्लीला दबावाखाली आणले. १३व्या मिनीटाला पुणेकरांनी १०-६ अशी भक्कम आघाडी घेतली. कर्णधार मनजीत चिल्लरने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावताना चढाई व पकडीत प्रत्येकी ४ गुणांची कमाई करुन निर्णायक अष्टपैलू खेळी केली. तर दीपक हूडाने तुफान चढाया करताना ९ गुण वसूल केले.
मध्यंतराला पुणेकरांनी १६-९ अशी आघाडी घेत सामन्याचे चित्र स्पष्ट केले. दिल्लीचा हुकमी एक्का काशिलिंग आडके पुणेकरांसमोर फारशी चमक दाखवू शकला नाही. त्याच्या अनेक चढाया पुण्याच्या मजबूत पकडीत अडकल्या. काशिलिंगच्या १४ चढायांपैकी
केवळ ४ चढाया यशस्वी ठरल्या.
त्याने ५ गुणांची कमाई केली.
तर रोहित कुमार, कर्णधार रविंदर
पहल व सुरजीत सिंगची झुंज अपयशी ठरली.
तत्पूर्वी रंगतदार सामन्यात बलाढ्य पटणाने सलग दुसरा विजय नोंदवताना यजमान बंगळुरुला ३३-२४ असे नमवले. सुरुवातीलाच सुरजीत नरवाल व अमित राठी या अव्वल खेळाडूंच्या जबरदस्त पकडी करुन पटणाने यजमानांना धोक्याचा इशारा दिला. यानंतर त्यांनी आणखी आक्रमक पवित्रा घेत बाजी मारली. १६ व्या मिनीटाला बंगळुरुवर लोण चढवून पटणाने मध्यंतराला २०-१० अशी भक्कम आघाडी घेतली.