पंजाबचा पराभव करत पुण्याचा प्ले ऑफमध्ये प्रवेश
By admin | Published: May 14, 2017 07:56 PM2017-05-14T19:56:38+5:302017-05-14T20:09:05+5:30
रायझिंग पुणे सुपरजायंट्सनं घरच्या मैदानावरच किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला आहे
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 14 - रायझिंग पुणे सुपरजायंट्सनं घरच्या मैदानावरच किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव करत बाद फेरीत प्रवेश मिळवला आहे. पंजाबनं दिलेल्या 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पुण्यानं 1 गड्याच्या मोबदल्यात 12 षटकांत 78 धावा काढून सामन्यावर कब्जा मिळवला आहे. राहुल त्रिपाठीने दमदार फलंदाजीच्या जोरावर 20 चेंडूंत 4 चौकार आणि एक षटकार लगावत 28 धावा केल्या आहे. तर अखेरपर्यंत नाबाद राहत रहाणे आणि स्मिथनं नाबाद 37 धावांची भागीदारी केली. अजिंक्य रहाणेने 1 षटकार आणि 1 चौकारासह खेचत 34 धावांची खेळी केली. तर कर्णधार स्टिव्हन स्मिथ 15 धावांवर नाबाद राहिला.
12व्या षटकांतच पुणे संघाने विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. जयदेव उनाडकत याला मॅन ऑफ द मॅचचा किताब बहाल करण्यात आला आहे. या विजयामुळे पुणे संघाचा बाद फेरीत प्रवेश झाला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर पुण्यानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भेदक गोलंदाज जयदेव उनाडकतने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर मार्टिन गुप्टिलला बाद करून पंजाबला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यानंतर मैदानावर आलेल्या शॉन मार्श, वृद्धिमान साहा, इऑन मॉर्गन, राहुल तेवटिया आणि कर्णधार ग्लेन मॅक्सवेल यांनी नुसतीच हजेरी लावण्याचे काम केले. पंजाबकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 22 धावा केल्या. स्वप्नील शहा (10) आणि साहा (13) यांनीही पंजाबच्या धावसंख्येत भर घालण्याचा प्रयत्न केला. पंजाबचा डाव अवघ्या 73 धावांत आटोपला होता. पुण्याच्या शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 बळी घेऊन पंजाबला पराभवाची धूळ चारली आहे.