पुण्याचा अभिमन्यू बनला ग्रॅण्डमास्टर! पुण्यातील तिसरा, तर महाराष्ट्रातील सातवा बुद्धिबळपटू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 06:01 AM2017-08-23T06:01:00+5:302017-08-23T06:01:00+5:30
बुद्धिबळाच्या क्षेत्रात पुण्याचे भूषण असलेला अभिमन्यू पुराणिक याने बुद्धिबळातील ग्रॅण्डमास्टर किताबाचे चक्रव्यूह भेदण्यात यश प्राप्त केले आहे.
पुणे : बुद्धिबळाच्या क्षेत्रात पुण्याचे भूषण असलेला अभिमन्यू पुराणिक याने बुद्धिबळातील ग्रॅण्डमास्टर किताबाचे चक्रव्यूह भेदण्यात यश प्राप्त केले आहे. २५०० एलो रेटिंग गुणांचा टप्पा ओलांडत या १७ वर्षीय खेळाडूने सोमवारी रात्री ग्रॅण्डमास्टर किताबासाठी आवश्यक तिसरा व अंतिम नॉर्म पूर्ण केला.
अबूधाबी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अभिमन्यूने हा नॉर्म पूर्ण केला. ग्रॅण्डमास्टर हा किताब पटकावणारा अभिमन्यू हा पुण्यातील तिसरा, राज्यातील सातवा, तर देशातील ४९वा बुद्धिबळपटू ठरला आहे. ७ ग्रॅण्डमास्टर, एक वूमन ग्रॅण्डमास्टरसह अनेक मातब्बर प्रतिस्पर्ध्यांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत अभिमन्यूला ३७वे मानांकन होते. या स्पर्धेआधी त्याच्या खात्यावर २४९५ एलो रेटिंग गुण जमा होते. ग्रॅण्डमास्टरच्या किताबासाठी त्याला केवळ ५ गुणांची आवश्यकता होती. ९ फेºयांच्या या स्पर्धेत सातव्या फेरीत इंडिक अलेक्झांडरचे आव्हान अभिमन्यूने साडेपाच तासांच्या लढतीनंतर परतवून लावले. १२७व्या चालीअखेर अलेक्झांडरने पराभव मान्य केला. आठव्या फेरीत ग्रॅण्डमास्टर पी. लुका याला रोखण्यासाठी अभिमन्यूला बराच संघर्ष करावा लागला. मात्र, ही लढत बरोबरीत सोडवून त्याने ग्रॅण्डमास्टर किताबासाठी आवश्यक गुणांचा टप्पा ओलांडला. स्पर्धेअखेर त्याचे रेटिंग गुण २५१० इतके झाले आहे. या स्पर्धेत अभिमन्यू ५.५ गुणांसह ११व्या स्थानी राहिला. अभिमन्यू १० वर्र्षांपासून ‘फिडे’चे मान्यताप्राप्त प्रशिक्षक जयंत गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असून तो सिम्बायोसिसमध्ये १२वी शिक्षण घेत आहे. सरावासाठी वूमन इंटरनॅशनल मास्टर, आकांक्षा हगवणे, चिन्मय कुलकर्णी, इंटरनॅशनल मास्टर समीर काठमाळे, राकेश कुलकर्णी, वूमन ग्रॅण्डमास्टर सौम्या स्वामिनाथन, अनिरूद्ध देशपांडे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचा उल्लेख अभिमन्यूने आवर्जून केला.
राज्यातील सर्वांत तरुण ग्रॅण्डमास्टर
अभिमन्यू हा राज्यातील सर्वांत कमी वयाचा ग्रॅण्डमास्टर ठरला आहे. सध्या त्याचे वय १७ वर्षे, ६ महिने आणि १९ दिवस इतके आहे. या आधी हा विक्रम नाशिकचा ग्रॅण्डमास्टर विदित गुजराथी याच्या नावावर होता. २०१३ मध्ये १८ वर्षांचा असताना त्याने हा किताब मिळविला होता. अभिजित कुंटे आणि अक्षयराज कोरे हे पुणेकर अनुक्रमे वयाच्या २३व्या व २४व्या वर्षी ग्रॅण्डमास्टर बनले होते.