पंजाबचे बल्ले बल्ले!
By admin | Published: May 14, 2015 01:15 AM2015-05-14T01:15:32+5:302015-05-14T01:15:32+5:30
पावसाने दिलेल्या ‘ब्रेक’मुळे जवळपास अडीच तास उशिराने सुरू झालेल्या सामन्यात प्रीती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने बाजी मारली
मोहाली : पावसाने दिलेल्या ‘ब्रेक’मुळे जवळपास अडीच तास उशिराने सुरू झालेल्या सामन्यात प्रीती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने बाजी मारली. त्यांनी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा २२ धावांनी पराभव केला. पंजाब संघ याआधीच प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला, तरी त्यांना हा विजय दिलासा देणारा ठरला. पंजाबने निर्धारित १० षटकांत ६ बाद १०६ धावा उभारल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूने ६ बाद ८४ धावसंख्येपर्यंत मजल मारली.
प्रत्युत्तरात, बंगळुरूनेही धडाक्यात सुरुवात केली होती. विराट-गेल जोडीने २.१ षटकांत ३३ धावा केल्या. कोहली अनुरितच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्याने ९ चेंडूंत १९ धावा केल्या. यामध्ये २ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. गेलने १७, डिव्हिलियर्सने १० आणि मनदीपसिंगने सर्वाधिक २० धावांचे योगदान दिले. मनदीप बाद झाल्यानंतर बंगळुरूचे फलंदाज झटपट बाद होत गेले. अखेर त्यांना निर्धारित षटकांत ६ बाद ८४ धावसंख्येवर समाधान मानावे लागले. पंजाबकडून अनुरितसिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन, तर संदीप शर्मा आणि हेन्ड्रीक्स यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
याआधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दहा षटकांच्या या सामन्यात पंजाबकडून वृद्धिमान साहा आणि मनन वोहरा यांनी सुरुवात केली. साहाने १२ चेंडूंत ३१ धावा चोपल्या. त्याने ५ चौकार आणि एक षटकार ठोकला. सामन्याच्या दुसऱ्या षटकांत अरविंदच्या गोलंदाजीवर साहाने १८ धावा फटकावल्या. यामध्ये ३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. डेव्हिड वीजच्या चेंडूंवर तो मनदीपकरवी झेलबाद झाला. त्यानंतर मॅक्सवेल (१०), डेव्हिड मिलर (१४), बेली (१३) यांनी बहुमूल्य योगदान दिले. अक्षर पटेलने १५ चेंडूंत नाबाद २० धावा केल्या. नवव्या षटकात अक्षरने चहलच्या चेंडूवर षटकार ठोकला होता. मात्र, चहलने बेलीला बाद करून मोठा अडथळा दूर केला. अंतिम षटकात स्टार्कने दिनेश कार्तिककरवी गुरकिरतला (२) बाद केले. बंगळुरूकडून हर्षल पटेल आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २, तर स्टार्क आणि वीज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. (वृत्तसंस्था)