पंजाबचा सामना डेअरडेव्हिल्सविरुद्ध
By admin | Published: April 15, 2017 04:39 AM2017-04-15T04:39:48+5:302017-04-15T04:39:48+5:30
रायजिंग पुणे सुपरजायंटस्विरुद्ध ९७ धावांनी मोठा विजय नोंदविणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला घरच्याच फिरोजशह कोटला मैदानावर किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध
नवी दिल्ली : रायजिंग पुणे सुपरजायंटस्विरुद्ध ९७ धावांनी मोठा विजय नोंदविणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला घरच्याच फिरोजशह कोटला मैदानावर किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध आयपीएल-१० मध्ये आज शनिवारी खेळायचे आहे.
कर्णधार जहीर खानच्या नेतृत्वात दिल्लीचा गोलंदाजी मारा भक्कम वाटतो. पण गोलंदाजीत काही उणिवा आहेत. दुसरीकडे ग्लेन मॅक्सवेलच्या पंजाब संघाची बलाढ्य बाजू त्यांची फलंदाजी असली तरी केकेआरविरुद्ध काल संघाला आठ गड्यांनी पराभव पत्करावा लागला. गोलंदाजांनी अद्याप प्रभावी कामगिरी केली नसल्याने याचा लाभ दिल्ली संघ घेऊ शकतो.
दिल्लीची फलंदाजी आतापर्यंत तरी ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्याच सभोवताल फिरताना दिसली. सॅमसनने पुण्याविरुद्ध पहिले शतक झळकविले. पंतने आरसीबीविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. ख्रिस मॉरिस याने पुण्याविरुद्ध केवळ ९ चेंडूत नाबाद ३८ धावा ठोकून प्रभावी अष्टपैलू खेळाडू असल्याचे दाखवून दिले. त्याने गोलंदाजीत आरसीबी आणि पुण्याविरुद्ध टिच्चून मारा केला होता. सलामीचे आदित्य तारे आणि सॅम बिलिंग्स मात्र अपयशी ठरत आहेत. दोघांनी सुरुवात चांगली केली पण मोठी खेळी करण्यात दोघांना अद्यापही यश आलेले नाही. कोरी अॅन्डरसनने मात्र निराशा केली. कार्लोस ब्रेथवेट हा चांगला अष्टपैलू खेळाडू आहे पण त्याने देखील पहिल्या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीत निराश केले. संघाला यशस्वी व्हायचे झाल्यास अष्टपैलू खेळाडूंची कामगिरी उंचावायला हवी. याशिवाय फलंदाज करुण नायरची बॅट तळपायला हवी.
डेअरडेव्हिल्सच्या गोलंदाजांनी दोन्ही सामन्यात भेदक मारा केला. मॉरिससह कर्णधार जहीर खान आणि पॅट कमिन्स हे प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवित आहेत. लेग स्पिनर अमित मिश्रा पहिल्या लढतीत महागडा ठरल्यानंतर पुण्याविरुद्ध प्रभावी ठरला. फिरकी गोलंदाज शहबाज नदीम याने देखील मोक्याच्या क्षणी बळी घेतले आहेत.
मोहम्मद शमी आणि कासिगो रबाडा यांना अद्यापही संधी मिळालेली नाही. पंजाबकडे मनन वोरा आणि हाशिम अमला हे चांगले फलंदाज आहेत. कर्णधार ग्लेन मॅक्सवेलच्या खेळीवर बरेच काही विसंबून असेल. (वृत्तसंस्था)