ऑलिम्पिकमध्ये पंजाब, हरियाणाचे वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 09:59 AM2021-07-22T09:59:24+5:302021-07-22T10:01:07+5:30
टोकियो ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय पथकात सर्वाधिक खेळाडूंची संख्या पंजाब आणि हरियाणा राज्यातील आहे.
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय पथकात सर्वाधिक खेळाडूंची संख्या पंजाब आणि हरियाणा राज्यातील आहे. या दोन्ही राज्यातील जवळपास ५० खेळाडू संघात असून भारतीय पथकात ही संख्या ४० टक्के इतकी आहे.
या दोन्ही राज्यातील एकूण लोकसंख्या केवळ ४.४ टक्के इतकी असून एकट्या हरियाणाने २५ टक्के खेळाडू पाठवले. हरियाणाचे ३१ तर पंजाबचे १९ खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पाठवले असून तामिळनाडूचे ११ खेळाडू पथकात आहेत. अव्वल पाच राज्यांमध्ये केरळ आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. या दोन्ही राज्यातील प्रत्येकी ८-८ खेळाडू आहेत. लोकसंख्येत उत्तर प्रदेश नंबर वन असून देशातील एकूण लोकसंख्येपैकी १७ टक्के लोक या राज्यात वास्तव्यास आहेत. केरळची लोकसंख्या २.३ टक्के आहे. भारतीय पथकात या उत्तर प्रदेशची टक्केवारी ६.३ आणि केरळची ६.६ अशी आहे.
तामिळनाडूचे पाच ॲथ्लिट, तीन जलतरणपटू, दोन टेबल टेनिसपटू, आणि एक तलवारबाज सहभागी झाले असून केरळमधून ८ पैकी ६ खेळाडू ट्रॅकवर दिसणार आहेत. शिवाय एक जलतरणपटू आणि पुरुष हॉकीत एक खेळाडू सहभागी होत आहे.
- टोकियोत भारताचे २२८ सदस्यांचे पथक सहभागी झाले असून त्यात १२७ खेळाडू आहेत. एकूण १८ खेळांच्या ६८ प्रकारात त्यांना सहभागी व्हायचे आहे.
- तीरंदाजी, ॲथ्लेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, अश्वारोहण, तलवारबाजी, गोल्फ, जिम्नॅस्टिक, हॉकी, ज्युडो, रोईंग, नौकायान, जलतरण, टेबल टेनिस, टेनिस, भारोत्तोलन आणि कुस्तीचा समावेश आहे.
- १९ महिलांच्या हॉकी पथकात हरियाणाच्या ९ खेळाडूंचा समावेश आहे, याशिवाय ७ मल्ल (४ महिला, तीन पुरुष),चार मुष्टियोद्धे(३ पुरुष, एक महिला), ४ नेमबाज(२ महिला, २ पुरुष), हे पदकासाठी चढाओढ करतील.
- १९ सदस्यांच्या पुरुष हॉकी संघात पंजाबचे ११ खेळाडू आहेत.
- याशिवाय दोन नेमबाज, दोन ॲथ्लिट (एक पुरुष, एक महिला), महिला हॉकी संघात दोन आणि एका बॉक्सरचा समावेश आहे.