राजकोटमध्ये पंजाब किंग! गुजरातवर 26 धावांनी मात

By admin | Published: April 23, 2017 05:37 PM2017-04-23T17:37:40+5:302017-04-23T19:32:40+5:30

आयपीएलमध्ये आज झालेल्या पहिल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने गुजरात लायन्सवर

Punjab King in Rajkot Gujarat beat by 26 runs | राजकोटमध्ये पंजाब किंग! गुजरातवर 26 धावांनी मात

राजकोटमध्ये पंजाब किंग! गुजरातवर 26 धावांनी मात

Next
>ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 23  -  हाशिम आमलाचे अर्धशतक, अक्षर पटेलने केलेली अष्टपैलू कामगिरी आणि त्याला इतरांडून लाभलेली सुरेख साथ याच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलमध्ये आज झालेल्या पहिल्या लढतीत गुजरात लायन्सवर 26 धावांनी मात केली. त्याबरोबरच सलग चार पराभनांची मालिका खंडित करत पंजाबने या हंगामातील सात सामन्यांमधील आपल्या तिसऱ्या विजयाची नोंद केली. तर गुजरातला पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. 
गेल्या लढतीत कोलकाता नाइटरायडर्सविरुद्ध जबरदस्त कामगिरी करणाऱ्या गुजरातला पंजाबने दिलेले 189 धावांचे आव्हान पेलवले नाही. ब्रँडन मॅक्युलम (6), आरोन फिंच (13) आणि सुरेश रैना (32) हे मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्याने गुजरात लायन्सच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. पाठोपाठ रवींद्र जडेजा (9), ड्वेन स्मिथ (4) आणि अक्षदीप नाथ (0) हेही बाद झाल्याने गुजरातचा संघ पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला. 
पण एकाकी झुंज देणाऱ्या दिनेश कार्तिकने (नाबाद 58) अँड्र्यू टायसह (22) 35 धावांची भागीदारी करत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची झुंज अपयशी ठरली. अखेर गुजरातला घरच्या मैदानावर 26 धावांनी पराभव पत्करावा लागला. पंजाबकडून अक्षर पटेल, संदीप शर्मा आणि करिअप्पा यांनी प्रत्येकी दोन गडी टिपले.  
तत्पूर्वी  किंग्ज इलेव्हन पंजाबने गुजरात लायन्ससमोर विजयासाठी 189 धावांचे आव्हान ठेवले होते.  हाशिम आपलाने केलेली अर्धशतकी  खेळी आणि कर्णधार ग्लेन मॅक्सवेल व अक्षर पटेल यांनी केलेल्या  फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने 20 षटकात 7 बाद 188 धावा फटकावल्या.
गुजरात लायन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर मनन व्होराच्या (2) रूपात पंजाबला पहिला धक्का बसला. मात्र आज सलग दुसऱ्या सामन्यात हाशिम आमलाने पंजाबसाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. 40 चेंडूत 65 धावांची खेळी करणाऱ्या आमलाने शॉन मार्शच्या (30) साथीने दुसऱ्या गड्यासाठी 70 धावांची  आणि ग्लेन मॅक्सवेलसोबत (31) 47 धावांची भागीदारी केली.
 मात्र आमला आणि मॅक्सवेल पाठोपाठ बाद झाल्याने पंजाबचा डाव अडखळला. पाठोपाठ स्टोनियसही 7 धावा काढून बाद झाला. मात्र अक्षर पटेलने 17 चेंडूत 34  आणि वृद्धिमान साहाने  5 चेंडूत 10 धावा फटकावत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. गुजरातकडून अँड्रयू टायने दोन आणि रवींद्र जडेजा, ड्वेन स्मिथ, शुभम अग्रवाल आणि नाथू सिंग यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.  

Web Title: Punjab King in Rajkot Gujarat beat by 26 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.