आरसीबीची शिकार करण्यास पंजाब सज्ज
By admin | Published: May 5, 2017 01:09 AM2017-05-05T01:09:48+5:302017-05-05T01:09:48+5:30
आयपीएल प्ले आॅफच्या शर्यतीत असलेला किंग्ज इलेव्हन पंजाब संघ स्पर्धेतून बाद झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर शुक्रवारी शानदार विजयाची नोंद
बंगळुरू : आयपीएल प्ले आॅफच्या शर्यतीत असलेला किंग्ज इलेव्हन पंजाब संघ स्पर्धेतून बाद झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर शुक्रवारी शानदार विजयाची नोंद करण्यास सज्ज झाला आहे. नऊ सामन्यांत आठ गुणांसह पंजाब पाचव्या स्थानावर आहे. तळाच्या स्थानाला असलेल्या बँगलोरचे ११ सामन्यांत आठ पराभवानंतर केवळ ८ गुण झाले.
प्ले आॅफसाठी पंजाबला प्रत्येक लढतीत विजय आवश्यक आहे. आरसीबी देखील उर्वरित सामने जिंकून सन्मानाने निरोप घेण्यास इच्छुक असेल. दिग्गजांना वगळून कोहली नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकतो. पंजाबने मागच्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सवर दहा गड्यांनी विजय साजरा केला होता. सध्याचा फॉर्म बघता आरसीबीविरुद्धचा सामना त्यांना कठीण जाणार नाही. ग्लेन मॅक्सवेलच्या नेतृत्वाखालील या संघाकडून हशिम अमलाने एका शतकासह ३१५ धावा केल्या, तर मार्टिन गुप्तिलने २७ चेंडूंत अर्धशतकी खेळी केली आहे. नऊ सामन्यांत केवळ १९३ धावा करणाऱ्या मॅक्सवेलकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. पंजाबच्या फलंदाजांपुढे एकसंघ कामगिरी करण्याचे आव्हान आहे. गोलंदाजीत संदीप शर्मा आणि वरुण अॅरोन, फिरकी गोलंदाज अक्षर पटेल यांच्यावर भिस्त असेल.
आरसीबीला फलंदाजांच्या अपयशाने ग्रासले आहे. विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, हे आक्रमक फलंदाज सपशेल अपयशी ठरले. मनदीपसिंग, केदार जाधव आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी घोर निराशा केली. लेगस्पिनर सॅम्युअल बद्री आणि यजुवेंद्र चहल यांनी ११ गडी बाद केले, पण वेगवान गोलंदाजांनी आशेवर पाणी पाडले.(वृत्तसंस्था)