पंजाब आव्हान राखणार का ?
By admin | Published: May 11, 2017 01:51 PM2017-05-11T13:51:15+5:302017-05-11T13:55:52+5:30
मुंबई इंडियन्सचा सामना आज थोड्याच वेळात स्पर्धेत आपले आव्हान कायम राखण्यासाठी झुंजणा-या किंग्ज इलेव्हन पंजाबशी होणार आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि. 11 - अव्वल स्थान कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना आज थोड्याच वेळात स्पर्धेत आपले आव्हान कायम राखण्यासाठी झुंजणा-या किंग्ज इलेव्हन पंजाबशी होणार आहे. मुंबईच्या होमग्राउंडवर होणा-या या सामन्यासाठी मुंबईलाच पसंती मिळत आहे. मात्र पंजाबने आतापर्यंत भल्या भल्या संघांना पाणी पाजले आहे. मुंबई इंडियन्सचा संघ हा या सत्रातील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने आतापर्यंत फक्त ३ सामन्यात पराभव स्विकारला आहे.
तर २२ एप्रिलला पंजाब विरुद्ध मुंबई या सामन्यात मुंबईने २७ चेंडू आणि ७ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात पंजाबच्या आमलाने तुफानी शतक झळकावले होते. मात्र जोश बटलर, नितिश राणा, पार्थिव पटेल यांच्या खेळीपुढे आमलाची खेळी फिकी पडली होती. सध्या मुंबईसाठी लेंडल सिमन्स आणि पार्थिव पटेल हे चांगली सुरूवात करुन देत आहेत. तर रोहित शर्मा हा मुंबईसाठी फिनिशरची भूमिका बजावतो.तो लयीत असला की भले भले गोलंदाजही त्याला दचकून असतात.
लयीत असताना तो जगातील सर्वात धोकादायक फलंदाज म्हणून गणला जातो. रोहित सध्या अशाच लयीत आहे. सनराजयर्स विरोधात पराभव झाला असला तरी रोहितने ६७ धावा करत आपली लय दाखवून दिली होती. कृणाल, हार्दिक पांड्या, केरॉन पोलार्ड हे मुंबईची मधली फळी मजबूत करतात. मुंबईच्या सर्वच गोलंदाजांनी या स्पर्धेत संघाला गरज असताना प्रतिस्पर्ध्यांना नमोहराम केले आहे. या आयपीएलमधील सर्वोत्तम ओव्हर ही जसप्रीत बुमराहने टाकलेल्या सुपर ओव्हरला म्हटले जाऊ शकते.
तर मिशेल मॅक्लेघनने मुंबईकडून सर्वाधिक १७ बळी घेतले आहेत. त्याला बुमराह आणि लसीथ मलिंगा यांची चांगली साथ मिळते. सोबतीला हार्दिक पांड्याही आहे. त्यासोबतच फिरकीची धुरा कर्ण शर्मा आणि हरभजन सिंह सांभाळत आहेत. मात्र अतिरिक्त फलंदाज आणि चांगल्या अष्टपैलुची गरज भासल्यास कर्ण शर्मा ऐवजी कृणाल पांड्याला संधी मिळू शकते. केकेआरविरोधात विजय मिळवल्याने आत्मविश्वास वाढलेला पंजाबचा संघ मुंबईला कडवी टक्कर देण्याच्या प्रयत्नात राहील.
पंजाब या सामन्यात पराभूत झाल्यास प्ले ऑफच्या बाहेर जाईल. तर मुंबईला क्वालिफायर खेळायची असेल.तर विजय गरजेचा आहे. मुंबईच्या फलंदाजांसमोर संदीप शर्मा, मोहित शर्मा, मागच्या सामन्यात संधी मिळालेला राहूल तेवतिया यांचे आव्हान आहे. तेवतियाने केकेआरच्या गंभीर आणि उथप्पा या खंदया फलंदाजांना बाद करत आपला दम दाखवून दिला होता. मोहित शर्माला गवसलेला सूर ही पंजाबसाठी दिलासा देणारी बाब आहे.
ग्लेन मॅक्सवेलही फॉर्ममध्ये आहे. वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी ही फलंदाजीला साथ देणारी आहे. या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणे सोपे होते. मात्र हेच पंजाबला या स्पर्धेत फारसे जमलेले नाही. मार्टिन गुप्तील आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करु शकलेला नाही. तर आमलाच्या या सामन्यातील खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे फलंदाजीची सगळी जबाबदारी शॉन मार्श, मनन व्होरा, वृद्धीमान साहा यांच्यावर आहे. या सामन्यात मुंबईने विजय मिळवला तर त्यांचे २० गुण होतील. आणि ते अव्वल स्थानावर कायम राहतील. जर पंजाबने विजय मिळवला तर त्यांचे १४ गुण होतील. मात्र तरीही प्ले ऑफसाठी त्यांना पुढच्या सामन्यात विजय मिळवावा लागेल.