आरसीबीवर भारी पडला पंजाबी ‘भांगडा’
By admin | Published: April 11, 2017 04:07 AM2017-04-11T04:07:00+5:302017-04-11T04:07:00+5:30
गोलंदाजांच्या अचूक कामगिरीनंतर हाशिम आमला आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या धडाक्याच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएल १० मधील सलग दुसरा
इंदूर : गोलंदाजांच्या अचूक कामगिरीनंतर हाशिम आमला आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या धडाक्याच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएल १० मधील सलग दुसरा विजय मिळवताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा धुव्वा उडवला. आरसीबीने दिलेल्या १४९ धावांचा पाठलाग करताना पंजाबने केवळ २ फलंदाज गमावून १४.३ षटकांतच विजय मिळविला.
होळकर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हाशिम आमलाने जबरदस्त ‘हमला’ केल्याने पहिल्या डावातील एबी डिव्हिलियर्सची वादळी खेळी मागे पडली. आमलाने ३५ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकार ठोकून नाबाद ५८ धावा कुटल्या. तसेच, कर्णधार ग्लेन मॅक्सवेलनेही वाहत्या गंगेत हात धुऊन घेताना २२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४३ धावांचा चोप देत पंजाबचा सलग दुसरा विजय साकारला.
मनन वोहरा आणि आमला या सलामी जोडीने पहिल्या षटकापासूनच आक्रमक पवित्रा घेत आपला इरादा स्पष्ट केला. या दोघांच्या फटकेबाजीपुढे आरसीबीचे सर्वच गोलंदाज हतबल दिसत होते. या दोघांनी सहा षटकांत १०हून अधिक सरासरीने धावा फटकावून आरसीबीच्या आव्हानातली हवा काढली. वोहरा २१ चेंडूंत ३४ धावा काढून परतला. आमला-मॅक्सवेल जोडीने पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, अडखळत्या सुरुवातीनंतर संघाला समाधानकारक मजल मारून देताना धडाकेबाज एबी डिव्हिलियर्सने चौफेर फटकेबाजी केली. त्याने अखेरच्या काही षटकांत केलेल्या तुफानी फलंदाजीमुळे पंजाबचे गोलंदाज प्रचंड दबावाखाली दिसले. विशेष म्हणजे, ९ षटकारांची आतषबाजी करताना डिव्हिलियर्सने तीन वेळा चेंडू स्टेडियमबाहेर भिरकावला. अक्षर पटेल, संदीप शर्मा आणि वरुण अॅरोन यांनी प्रत्येकी एक बळी घेऊन आरसीबीच्या फलंदाजीला खिंडार पाडले होते. नाणेफेक जिंकून कर्णधार शेन वॉटसनने घेतलेला फलंदाजीचा निर्णय चांगलाच अंगलट आला.
सामन्यातील पहिले षटक टाकणाऱ्या फिरकीपटू अक्षरने सुरुवातीलाच झटका देताना कर्णधार वॉटसनला त्रिफळाचीत केले. कर्णधार बाद झाल्यानंतर डिव्हीलियर्सने काही अप्रतिम फटके मारून २ चौकार व एक उत्तुंग षटकार ठोकून पाठीराख्यांना नाराज केले नाही. मात्र, विष्णू विनोद आणि आक्रमक केदार जाधव पाठोपाठ बाद झाल्याने आरसीबीचा डाव ३ बाद २२ धावा, असा घसरला.
डिव्हिलियर्सने यानंतर जम बसल्यावर ४६ चेंडूंत ३ चौकार आणि तब्बल ९ षटकारांचा पाऊस पाडताना नाबाद ८९ धावांची वादळी खेळी केली. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक :
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : २० षटकांत ४ बाद १४८ धावा (एबी डिव्हिलियर्स नाबाद ८९, मनदीपसिंग २८; वरुण अॅरोन २/२१) पराभूत किंग्ज इलेव्हन पंजाब : १४.३ षटकांत २ बाद १५० धावा (हाशिम आमला नाबाद ५८, ग्लेन मॅक्सवेल नाबाद ४३; टायमल मिल्स १/२२, यजुवेंद्र चहल १/२९).