आरसीबीच्या फलंदाजीवर पंजाब भारी
By admin | Published: May 6, 2017 01:47 AM2017-05-06T01:47:02+5:302017-05-06T01:47:02+5:30
रॉयल चँलेजर्स बंगलुरूच्या फलंदाजाना या सत्रात नेमके काय झाले आहे हे कुणालाच कळत नाही. स्फोटक मानली जाणारे आरसीबीचे फलंदाज आता
आकाश नेवे/आॅनलाईन लोकमत
रॉयल चँलेजर्स बंगलुरूच्या फलंदाजाना या सत्रात नेमके काय झाले आहे हे कुणालाच कळत नाही. स्फोटक मानली जाणारे आरसीबीचे फलंदाज आता कोण तंबूत लवकर परततो, याचीच जणू स्पर्धा लावत आहे. पंजाबकडून फक्त १३९ धावांचे
लक्ष्य मिळाले असतानाही बंगलुरूचा संघ ११९ धावात सर्वबाद झाला. त्यात गेल, डिव्हिलियर्स, विराट कोहली, जाधव या चौकडीने मिळून फक्त २२ धावा केल्या. त्या गेल शुन्यावर बाद झाला. सामनावीराचा बहुमान पटकावलेल्या संदीप शर्माने या सामन्यात एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला.त्याने तीन बळी घेतले. त्याने गेल, कोहली आणि एबीडी या तिघांना बाद केले. एकाच सामन्यात या तिन्ही फलंदाजांना या पुर्वी एकाच गोलंदाजाने बाद केले नव्हते. संदीपने या सामन्यात ही कामगिरी करून दाखवली. त्याने लागोपाठच्या प्रत्येक षटकांत एक बळी घेतला. आरसीबीची आघाडीची फळी तंबूत परत पाठवल्यावर इतर गोलंदाजांचे काम सोपे झाले. लक्ष्य छोटे असताना खेळी कशी करावी, हे आरसीबीचा सलामीवीर मनदीप सिंह याने या तिन्ही वरिष्ठ खेळाडूंना दाखवून दिले. मात्र त्याला इतर खेळाडूंची साथ लाभली नाही. गेल बाद झाल्यावर विराटही लगेचच तंबूत परतला. दोन खंदे फलंदाज बाद झाल्यानंतर सावधपणे संघाची धावसंख्या वाढवण्याऐवजी एबीडी फटकेबाजीच्या नादात बाद झाला. केदार जाधवनेही फटकेबाजीच्या नादात हे अक्षर पटेलकडे झेल दिला. पवन नेगी आणि सॅम्युअल बद्री या तळाच्या फलंदाजांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र अष्टपैलु अक्षर पटेलने आरसीबीच्या तळाच्या फलंदाजांना जास्त वेळ टिकू दिले नाही. पंजाबलाही फलंदाजी फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. मात्र अक्षर पटेलने १७ चेंडूत ३४ धावांची दमदार खेळी केल्याने पंजाबला आरसीबीसमोर आव्हान उभे करता आले. अखेरच्या षटकांत अक्षर पटेलने शेन वॉटसनच्या षटकांत वसूल केलेल्या धावाच आरसीबीला महागात पडल्या. त्यातच पंजाबच्या अफलातून गोलंदाजीमुळे आरसीबीचा पराभव झाला. सोप्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणेही त्यांना जमले नाही. या विजयाने पंजाबच्या प्ले आॅफच्या आशांना बळ मिळाले आहे. या सामन्यातील विजयाने पंजाबने १० सामन्यात पाच विजयांसह १० गुणांची कमाई केली आहे. चौथ्या स्थानासाठी प्रयत्न करणाऱ्या दिल्ली संघाला हा मोठा इशारा आहे. त्यासोबतच सध्या चौथ्या स्थानावर असलेल्या सनरायजर्सला देखील आता प्ले आॅफसाठी विजय मिळवणे गरजेचे बनले आहे.