दिल्लीविरुद्ध पंजाबचे पारडे जड
By admin | Published: April 15, 2015 01:35 AM2015-04-15T01:35:49+5:302015-04-15T01:35:49+5:30
इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) स्पर्धेत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने आत्तापर्यंत सलग ११ सामन्यांत पराभवाचे तोंड पाहिले आहे.
पुणे : इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) स्पर्धेत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने आत्तापर्यंत सलग ११ सामन्यांत पराभवाचे तोंड पाहिले आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाशी बुधवारी (दि. १५) होणाऱ्या सामन्यातही त्यांना पराभव स्वीकारावा लागल्यास आयपीएलमध्ये सर्वाधिक सलग पराभव स्वीकारणारा संघ म्हणून एक नकारात्मक विक्रम त्यांच्या नावावर जमा होईल. त्यामुळे दिल्ली पराभवाची मालिका खंडित करते की पंजाब सलग दुसरा विजय मिळवितो, याची उत्सुकता आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर उद्या रात्री आठ वाजता या दोन संघांत लढत होईल. पंजाबला गेल्या आठवड्यात राजस्थान रॉयल संघाविरुद्ध होम ग्राऊंडवर पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. मात्र, त्यानंतर मुंबई संघाशी झालेल्या सामन्यात त्यांनी विजय संपादन केला आहे. त्यामुळे सहाजिकच खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढीस लागला आहे. तर दुसरीकडे, संघातील खेळाडूंकडून चांगली कामगिरी होत असूनही निसटता पराभव स्वीकारावा लागला असल्याने दिल्लीच्या खेळाडूंवर याचा दबाव काही प्रमाणात असेल. दिल्लीने सलग पराभवाच्या बाबतीत पुणे वॉरियर्सशी बरोबरी केली आहे. या सामन्यातही त्यांचा पराभव झाल्यास सलग १२ पराभव स्वीकारणारा तो पहिला संघ
होईल. हा दुर्दैवी विक्रम टाळण्याचा दिल्लीचा प्रयत्न राहील. पहिल्या सामन्यात एल्बी मॉर्केलने नाबाद
७३ धावा तडकावत संघाला विजयाच्या समीप ठेवले होते, ही जमेची बाजू आहे.
डेअरडेव्हिल्सला पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून एका धावेने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर फिरोजशहा कोटला मैदानावर राजस्थान रॉयल्स संघाकडूनही त्यांना ३ विकेटनी पराभवाचा सामना करावा लागला. कामगिरी चांगली होऊनही हार स्वीकारावी लागल्याने साहजिकच खेळाडू निराश झाले आहेत. दिल्लीचा मुख्य फिरकी गोलंदाज इम्रान ताहीरने या सामन्यानंतर संघाची कामगिरी चांगली झाली; मात्र भाग्याने साथ दिली नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. दुखापतीमुळे झहीर खान व मोहंमद शमी यांच्या अनुपस्थितीतदेखील दिल्लीची गोलंदाजी चांगली होत आहे. फिरोजशहा कोटला मैदानावर
ताहीरने ४, तर अमित मिश्राने २ बळी घेतले होते. किंग्ज इलेव्हनचा स्टर फलंदाज ग्लेन मॅक्सवेलची बॅट अजून तळपलेली नाही. (क्रीडा प्रतिनिधी)
दोन्ही संघ समोरासमोर
आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब व दिल्ली डेअरडेव्हिल्स हे संघ १४ वेळा समोरासमोर आले आहेत. त्यांपैकी दिल्लीने ९ वेळा, तर डेअरडेव्हिल्सने ५ वेळा विजय मिळविला.
अक्षर पटेल, अनुरित सिंह, बूरान हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, जॉर्ज बेली, ग्लेन मॅक्सवेल, गुरकिर्तसिंह मान, करणवीरसिंह, मनन व्होरा, मिशेल जॉन्सन, परविंदर अवाना, रिषी धवन, संदीप शर्मा, शार्दूल ठाकूर, शान मार्श, शिवम शर्मा, तिसारा परेरा, वीरेंद्र सेहवाग, रिद्धीमान साहा, मुरली विजय, निखिल नाईक, योगेश गोलवलकर.
जेपी डुमिनी (कर्णधार), युवराजसिंग, मनोज तिवारी, क्विंटन डिकॉक, इम्रान ताहीर, नाथन कोल्टर नाइल, अँजेलो मॅथ्यूज, गुरिंदर संधू, ट्रेव्हिस हेड, एल्बी मोर्केल, मार्कस स्टोयनिस, केदार जाधव, मयंक अग्रवाल, मोहंमद शमी, अमित मिश्रा, जयदेव उनादकत, झहीर खान, शाहबाज नदीम, सौरभ तिवारी, जयंत यादव, श्रेयंस अय्यर, सी. एम. गौतम, श्रीकर भरत, केके जियास, डोमिनिक मुथ्थूस्वामी.