सिंगापूरमध्ये सिंधूचा बोलबाला! चीनच्या वँग झी यी हिला नमवून पटकावले जेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 09:19 AM2022-07-18T09:19:47+5:302022-07-18T09:21:11+5:30
भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद उंचावले.
सिंगापूर : भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद उंचावले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात सिंधूने चीनच्या वँग झी यी हिचा पराभव करत सिंधूने तिरंगा फडकावला. सिंधूने पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली आहे.
अंतिम लढतीत आघाडी घेतल्यानंतर सिंधूकडून अनेक चुका झाल्या. याचा फायदा घेत वँगने सामन्यात पुनरागमनही केले. मात्र, अत्यंत संयमी खेळ करताना सिंधूने खेळावरील लक्ष विचलित होऊ दिले नाही आणि २१-९, ११-२१, २१-१५ अशी बाजी मारत सिंधूने जेतेपदावर नाव कोरले. या वर्षी झालेल्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेतही सिंधू वँगविरुद्ध भिडली होती. त्यावेळीही सिंधूने तिला पराभवाचा धक्का दिला होता.
आता सिंधू २८ जुलैपासून रंगणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तयारी करणार असून या जेतेपदानंतर तिचा आत्मविश्वास उंचावेल. यंदाचे सिंधूचे हे तिसरे जेतेपद ठरले. याआधी तिने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय आणि स्विस ओपन स्पर्धा जिंकल्या होत्या. वँगविरुद्ध पहिला गेम मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर सिंधूला कडव्या खेळाचा सामना करावा लागला. वँगने दुसऱ्या गेममध्ये ११-३ अशी मोठी आघाडी घेतल्यानंतर सिंधूकडून नेटजवळ झालेल्या चुकांचा फायदा घेत दुसरा गेम जिंकला आणि १-१ अशी बरोबरी साधली. यानंतर पुन्हा एकदा निर्णायक गेममध्ये वँगने आघाडी घेतली. परंतु, सिंधूने संयमी खेळ करताना आधी आघाडी भरून काढली आणि नंतर वेगवान आणि आक्रमक खेळ करत वँगला नमवले.
पहिल्यांदाच सिंगापूर ओपन जेतेपद पटकावलेल्या पी. व्ही. सिंधूचे खूप अभिनंदन. तिने पुन्हा एकदा आपली अद्भुत गुणवत्ता सर्वांसमोर दाखवली. देशासाठी हा गौरवास्पद क्षण आणि भविष्यातील खेळाडूंना सिंधूची कामगिरी प्रेरणादायी ठरेल. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
गेल्या काही स्पर्धांमध्ये अटीतटीच्या लढती झाल्या, परंतु उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत पराभूत होणे निराशाजनक ठरले होते. अखेर हा अडथळा पार करण्यात यश आले, याचा आनंद आहे. मोठ्या कालावधीने सिंगापूरला आल्याचा आनंद आहे आणि येथे जिंकणे महत्त्वपूर्ण ठरेल. आगामी स्पर्धांमध्येही हीच लय कायम राखण्याचा प्रयत्न राहील. आता माझ्याकडे एक आठवड्याचा कालावधी असून नंतर राष्ट्रकुल स्पर्धेसाठी जायचे आहे. कदाचित मी एक दिवस कुटुंबीयांसोबत व्यतीत करू शकते. - पी. व्ही. सिंधू