पी.व्ही. सिंधू दुसऱ्या फेरीत पराभूत

By admin | Published: October 21, 2016 01:07 AM2016-10-21T01:07:04+5:302016-10-21T01:07:04+5:30

रिओ आॅलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावल्यानंतर पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत असलेल्या भारताच्या पी. व्ही. सिंधूचा डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत पराभव

P.V. Sindhu, who lost in the second round, | पी.व्ही. सिंधू दुसऱ्या फेरीत पराभूत

पी.व्ही. सिंधू दुसऱ्या फेरीत पराभूत

Next

ओडेनसे : रिओ आॅलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावल्यानंतर पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत असलेल्या भारताच्या पी. व्ही. सिंधूचा डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत पराभव झाला. जपानच्या सयाका सातोविरुध्द झालेल्या या अनपेक्षित पराभवामुळे सिंधूला गाशा गुंडाळावा लागला. त्याचवेळी, अजय जयराम आणि एचएस प्रणय यांचाही दुसऱ्या फेरीत पराभव झाल्याने भारताचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.
तीन गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात पहिला गेम गमावल्यानंतर बरोबरी साधूनही सातत्य राखण्यात अपयश आल्याने सिंधूला स्पर्धेबाहेर व्हावे लागले. एक तास आणि पाच मिनिटांपर्यंत रंगलेल्या या रोमांचक सामन्यात जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या जपानच्या सयाकाच्या आक्रमकतेपुढे सिंधूला १३-२१, २३-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला. तत्पुर्वी, सिंधूने चीनच्या बिंगजियाओला केवळ ३३ मिनिटांमध्येच २१-१४, २१-१९ असे लोळवून दिमाखात विजयी सलामी दिली होती. दुसरीकडे पुरुषांच्या गटातही भारताच्या पदरी निराशाच आली. चीनच्या शी युकीविरुध्द झालेल्या रोमांचक सामन्यात मोक्याच्यावेळी कच खाल्ल्याने अजय जयरामला २१-२३, १५-२१ असे पराभूत व्हावे लागले. पहिल्या गेममध्ये कडवी टक्कर दिलेल्या अजयकडून दुसऱ्या गेममध्ये पुनरागमनाची आशा होती. मात्र, युकीने मोक्याच्यावेळी आक्रमक खेळ करताना घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखताना सहज बाजी मारुन आगेकूच केली.
तसेच, प्रणयला मलेशियाचा बलाढ्य लीग चोंग वेईविरुध्द १०-२१, २०-२२ असा पराभव पत्करावा लागला. पहिला गेम मोठ्या फरकाने गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्याने जबरदस्त झुंज दिली. मात्र अनुभवी वेईने प्रणयच्या माफक चुकांचा अचूक फायदा घेत बाजी मारली. (वृत्तसंस्था)

Web Title: P.V. Sindhu, who lost in the second round,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.