अजिंक्य सिंधू! चीनची भिंत भेदत पटकावलं सिंगापूर ओपनचं विजेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 12:18 PM2022-07-17T12:18:26+5:302022-07-17T12:18:44+5:30
PV Sindhu: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज झालेल्या सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम लढतीमध्ये सिंधूने चीनच्या वँग झी यी हिचा पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला.
सिंगापूर - भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज झालेल्या सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम लढतीमध्ये सिंधूने चीनच्या वँग झी यी हिचा पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला. सिंगापूर ओपन स्पर्धेतील सिंधूचं हे पहिलंच विजेतेपद आहे. तसेच यंदाच्या हंगामातील हे तिचं तिसरं विजेतेपद आहे.
पी. व्ही. सिंधू आणि चीनची वँग झी यी यांच्यामध्ये झालेला महिला एकेरीचा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. सुमारे ५७ मिनिटे चाललेल्या या लढतीत सिंधूने जबरदस्त सुरुवात करताना पहिला गेम २१-९ असा अगदी आरामात जिंकला. मात्र दुसऱ्या गेममध्ये वँगने जोरदार पुनरागमन करताना दुसरा गेम २१-११ असा जिंकला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.
निर्णायक अशा तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी जिंकण्यासाठी जोर लावल्याने गेम अटीतटीचा झाला. मात्र सिंधूने हा गेम २१-१५ अशा फरकाने जिंकत हा सामना २१-९, ११-२१, २१-१५ असा खिशात टाकला आणि विजेतेपद पटकावले.