पीवायसी हिंदू जिमखानाचा दबदबा
By Admin | Published: March 16, 2017 03:37 AM2017-03-16T03:37:16+5:302017-03-16T03:37:16+5:30
पुण्याच्या पीवायसी हिंदू जिमखाना संघाने आंतरक्ल्ब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे दिमाखदार विजेतेपद पटकावताना मुंबईच्या सीसीआय क्लब संघाचा २४-७ असा धुव्वा उडवला
मुंबई : पुण्याच्या पीवायसी हिंदू जिमखाना संघाने आंतरक्ल्ब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे दिमाखदार विजेतेपद पटकावताना मुंबईच्या सीसीआय क्लब संघाचा २४-७ असा धुव्वा उडवला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात पुणेकरांनी एकहाती वर्चस्व राखताना मुंबईकरांना डोके वर काढण्याची एकही संधी दिली नाही.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) वतीने मुंबईतील टेनिस कोर्टवर झालेल्या या अंतिम सामन्यात १००+ गटात जयंत कढे - हेमंत बद्रे यांनी राजेश बत्रा - राजीव वालिया यांचा ६-२ असा पराभव करुन हिंदू जिमखानाला आघाडीवर नेले. यानंतर ९०+ गटामध्ये हिमांशू गोसावी - केदार शहा यांनी मुंबईच्या चेतन देसाई - इंतीकाब अली यांचा ६-४ असा पाडाव करुन संघाला २-० अशी दमदार आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या व अंतिम खुल्या गटात मुंबईकरांकडून प्रतिकाराची अपेक्षा होती. मात्र, या गटातील दोन्ही सामन्यात त्यांनी निराशाच केली.
या गटातील पहिल्या सामन्यात अनुप मिंडा - अभिषेक ताम्हाणे यांनी अंब्रीश अरोरा - गगन मंगत यांना ६-० असे लोळवल्यानंतर, केतन धुमाळ - परज नाटेकर यांनी विजय छाब्रीया - विक्रम संपत यांचा ६-१ असा धुव्वा उडवत संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. (क्रीडा प्रतिनिधी)