पाकसोबत क्रिकेट खेळण्याचा प्रश्नच उदभवत नाही : ठाकूर
By admin | Published: September 24, 2016 05:22 AM2016-09-24T05:22:01+5:302016-09-24T05:22:01+5:30
पाकिस्तानसोबत भविष्यात द्विपक्षीय क्रिकेट संबंध सुरळीत होण्याची शक्यता फेटाळून लावताना बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याबाबत विचार करणेही योग्य नसल्याचे म्हटले आहे.
कोझिकोड : पाकिस्तानसोबत भविष्यात द्विपक्षीय क्रिकेट संबंध सुरळीत होण्याची शक्यता फेटाळून लावताना बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याबाबत विचार करणेही योग्य नसल्याचे म्हटले आहे.
भाजपच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीसाठी येथे आलेले ठाकूर म्हणाले,‘भारत कुठल्याही क्षणी पाकिस्तानला नेस्तनाबूत करू शकतो, पण त्यांना जागतिक पातळीवर एकाकी पाडणे महत्त्वाचे आहे.’
ठाकूर यांना पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याच्या योजनेबाबत विचारले असता त्यांनी उरी दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देताना म्हटले की,‘जे काही घडले ते बघता याबाबत विचारही करणे योग्य नाही. पाकिस्तानसोबत यंदाच्या मोसमात मालिकेचा कुठलाही कार्यक्रम नाही.’
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधांमधील तणाव वाढला आहे. शेजारी देशाला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी होत आहे. भारताने पाकिस्तानला १९६५, १९७१ आणि कारगिल युद्धांमध्ये पराभूत केले होते. भारताने विश्व क्रिकेट स्पर्धेतील सर्वंच लढतींमध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे, असेही ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
जागतिक पातळीवर पाकिस्तानला एकाकी पाडणे महत्त्वाचे ठरेल, असेही ते यावेळी म्हणाले. (वृत्तसंस्था)