आफ्रिकन धावपटूंमध्ये रंगणार ‘शर्यत’; मॅरेथॉनसाठी मुंबईकर सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 05:46 AM2020-01-18T05:46:30+5:302020-01-18T05:46:41+5:30
भारतीय गटामध्येही मोठी चुरस
मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनची चुरस रविवारी पहाटे ५.१५ वाजल्यापासून रंगणार असून भारतीय गटामध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. त्याचवेळी, एलिट गटामध्ये इथियोपिया आणि केनिया या आफ्रिकन देशातील धावपटूंमध्ये मुख्य स्पर्धा रंगेल.
यंदाचे १७वे वर्ष असलेल्या या प्रतिष्ठेच्या मॅरेथॉनमध्ये सुमारे ५५, ३२२ धावपटूंनी सहभाग निश्चित केला आहे. यामध्ये ९,६६० मुख्य मॅरेथॉन आणि १५ हजार २६० धावपटू अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी होती. त्याचप्रमाणे, खुली १०किमी रन (८,०३२), ड्रीम रन (१९,७०७), वरिष्ठ नागरिक रन (१,०२२), दिव्यांग (१,५९६) व पोलीस कप (४५ संघ) अशा इतर गटांमध्येही शर्यत रंगेल.
एकूण ४ लाख २० हजार यूएस डॉलर किंमतीची बक्षिस रक्कम असलेल्या या मॅरेथॉनमध्ये मुख्य स्पर्धेतील पहिल्या तीन धावपटूंना अनुक्रमे ४५ हजार, २५ हजार आणि १७ हजार डॉलरचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील. अव्वल तीन भारतीय धावपटूंना अनुक्रमे ५, ४, व ३ लाख रुपयांचे बक्षिस मिळेल.
४२ किमी मुख्य मॅरेथॉन एलिट गटात इथियोपियाच्या आयले अॅबशेरो याची २ तास ४ मिनिट २३ सेकंदाची वेळ सर्वोत्तम आहे. यानंतर त्याचाच देशबांधव अबेरा कुमा याची २ तास ५ मिनिटे ५० सेकंदाची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यामुळे अॅबशेरोकडे मुंबई मॅरेथॉनचा संभाव्य विजेता म्हणून पाहिले जाते. मात्र प्रत्यक्षात एलिट धावपटूंची कामगिरी कशी होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महिलांच्या गटात अमाने बेरिसो (इथिओपिया), वर्कनेस अलेमू (इथिओपिया), रोदाह जेपकोरिर (केनिया) व शैला जेरोटिच (केनिया) यांच्यात झुंज रंगेल. अलेमू गतविजेती असून तिच्याकडे जेतेपद कायम राखण्याचे आव्हान असेल.
मॅरेथॉन वेळापत्रक
मुख्य मॅरेथॉन (हौशी) : पहाटे ५.१५ वाजता. सीएसएमटी येथून.
मुख्य मॅरेथॉन (एलिट) : सकाळी ७.२० वाजता. सीएसएमटी येथून.
अर्ध मॅरेथॉन : पहाटे ५.१५ वाजता. वरळी डेअरी येथून.
१० किमी रन : पहाटे ६.२० वाजता. सीएसएमटी येथून.
रशपाल सिंगकडे नजर
भारतीय धावपटूंमध्ये रशपाल सिंगकडे सर्वांचे लक्ष असेल. भारतीय एलिट धावपटूंमध्ये त्याची २:१९.१९ अशी सर्वोत्तम वेळ असून त्याला राहुल पाल (२:२१.४१) आणि श्रीनू बुगाथा (२:२३.५६) यांच्याकडून कडवे आव्हान मिळेल. महिलांमध्ये आॅलिम्पियन सुधा सिंग संभाव्य विजेती मानली जात असून तिला महाराष्ट्राच्या ज्योती गवतेकडून तगडे आव्हान मिळेल.