राफेल नदालची झुंजार आगेकूच
By admin | Published: January 24, 2017 12:27 AM2017-01-24T00:27:53+5:302017-01-24T00:27:53+5:30
स्पेनचा बलाढ्य राफेल नदाल आणि अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांनी आपापल्या लढतीत झुंजार विजय मिळवताना आॅस्टे्रलियन ओपन
मेलबर्न : स्पेनचा बलाढ्य राफेल नदाल आणि अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांनी आपापल्या लढतीत झुंजार विजय मिळवताना आॅस्टे्रलियन ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्याचप्रमाणे, कॅनडाचा मिलोस राओनिच आणि झेक प्रजासत्ताकाच्या कॅरोलिना प्लिस्कोवा यांनीही विजयी आगेकूच केली.
२००९मध्ये आॅस्टे्रलियन ओपनचे जेतेपद पटकावलेल्या नदालला विजयी आगेकूच करण्यासाठी फ्रान्सच्या सहाव्या मानांकित गाएल मॉनफिल्सविरुद्ध चांगलेच झुंजावे लागले. चार सेटपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या लढतीत नदालने ६-३, ६-३, ४-६, ६-४ अशी बाजी मारली. पहिले दोन सेट जिंकून २-० अशी भक्कम आघाडी घेतल्यानंतर नदालकडून सरळ ३ सेटमध्ये विजय अपेक्षित होता.
परंतु, मॉनफिल्सने सहजासजी हार न पत्करताना तिसऱ्या सेटमध्ये कडवा खेळ करीत नदालला जेरीस आणले. त्याने बेसलाईनवर उत्कृष्ट खेळ करताना आपल्या फटक्यांवरही चांगले नियंत्रण राखून नदालची सर्व्हिस भेदली. या सेटमध्ये मॉनफिल्सच्या चिवट खेळापुढे नदालही काहीसा दमल्याने त्याच्याकडून अनेक चुकाही झाल्या.
तिसरा सेट जिंकून आपले आव्हान कायम राखलेलेया मॉनफिल्सला चौथ्या सेटमध्ये सातत्य राखण्यात अपयश आले. पुरुषांच्या अन्य लढतीत, राओनिचने स्पेनच्या रॉबर्टाे बतिस्टा याला ७-६, ३-६, ६-४, ६-१ अशी मात दिली. १५व्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोवने उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिनचा २-६, ७-६, ६-२, ६-१ असा पाडाव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
महिलांमध्ये विक्रमी ग्रँडस्लॅम जेतेपदासह पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या सेरेनाने दमदार विजय मिळवताना झेक प्रजासत्ताकच्या १६व्या मानांकित बारबोरा स्टरीकोवाचा ७-५, ६-४ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत सेरेनापुढे ब्रिटनच्या जोहाना कोंटाचे आव्हान असेल. तसेच, प्लिस्कोवाने दणदणीत विजय मिळवताना आॅस्टे्रलियाच्या डॅरिया गॅवरिलोवाचा ६-३, ६-३ असा धुव्वा उडविला. (वृत्तसंस्था)
पेस-हिंगीसचा धडाका
मिश्र दुहेरीमध्ये भारताचा दिग्गज खेळाडू लिएंडर पेसने स्वित्झर्लंडच्या अनुभवी मार्टिना हिंगीससह खेळताना उपांत्यपूर्व फेरी गाठली. पेस-हिंगीस या बलाढ्य जोडीने एकतर्फी झालेल्या सामन्यात मॅट रीड - केसी डेलाक्वा या आॅस्टे्रलियन जोडीचा सरळ दोन सेटमध्ये ६-२, ६-३ असा फडशा पाडला. केवळ ५४ मिनिटांमध्ये बाजी मारताना पेस-हिंगीस यांनी सामन्यावर वर्चस्व राखले. हिंगीसने बेसलाईनवर उत्कृष्ट खेळ केला. तर, पेसने नेट्सवर अप्रतिम कौशल्य सादर करताना मॅट-केसी यांना पुनरागमनाची एकही संधी दिली नाही.
जील देसाईची विजयी कूच
मुलींच्या ज्युनिअर गटामध्ये भारताच्या जील देसाईने लक्षवेधी कामगिरी करताना उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याच वेळी दुहेरीत मात्र जीलला पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. जीलने एकेरीमध्ये धमाकेदार खेळ करताना जर्मनीच्या ज्यूल नीमेइरचा ६-४, ६-२ असा पराभव केला.
पुढच्या फेईत जीलपुढे सर्बियाच्या पाचव्या मानांकित ओल्गा दानिलोविचचे तगडे आव्हान असेल. ओल्गाने चीनच्या शुयुई मा हिचा ६-३, ६-१ असा धुव्वा उडवीत आगेकूच केली आहे. दुसरीकडे, दुहेरीमध्ये मात्र जीलचे आव्हान संपुष्टात आले आहे. वायलेट अपिसा हिच्यासह खेळताना जीलला यांग ली-रेबेको मसारोवा या चौथ्या मानांकित जोडीविरुद्ध ४-६, ४-६ असा पराभव पत्करावा लागला.