दुखापतीमुळे राफेल नदालची 'विम्बल्डन'मधूनही माघार
By admin | Published: June 10, 2016 08:34 AM2016-06-10T08:34:44+5:302016-06-10T08:39:18+5:30
टेनिस विश्वातील एकेकाळचा अव्वल टेनिसपटू राफेल नदाल सध्या दुखापतींमुळे त्रस्त असल्यामुळे त्याने विम्बल्डन स्पर्धेतून माघार घेतली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - टेनिस विश्वातील एकेकाळचा अव्वल टेनिसपटू राफेल नदाल सध्या दुखापतींमुळे त्रस्त असल्यामुळे त्याने विम्बल्डन स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्पेनच्या या खेळाडूची दुखापत गेल्या महिन्यात बळावल्याने त्याने फ्रेंच ओपन स्पर्धेतूनही माघार घेतली होती. गेल्या महिन्यात नदालने फ्रेंच ओपनच्या दुस-या फेरीनंतर स्पर्धेतून माघार घेतल्याचे जाहीर केले होते. ' ‘माझा हात मोडला नसला तरी मी जर खेळणे कायम ठेवले तर आगामी काही दिवसांमध्ये नक्की मोडेल. माझी परिस्थिती चांगली, पण अखेर हे जीवन आहे. रोला गॅरो नसते तर कदाचित मी सुरुवातीचे दोन दिवस खेळण्याची जोखीमही पत्करली नसती.' असे त्याने फ्रेंच ओपन स्पर्धेदरम्यान म्हटले होते. त्याचे हे दुखणे अजून बरे झाले नसून त्याने आता विम्बल्डन स्पर्धेतही सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असून 'फेसबूक'वरून ही घोषणा केली.
' माझ्या डॉक्टरांशी केलेली चर्चा आणि मेडिकल चेक-अपचे रिझल्ट पाहिल्यानंतर मी विम्बल्डन स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही, असे जाहीर करतो. हा निर्णय माझ्यासाठी अतिशय दु:खद असला तरीही माझ्या मनगटाची दुखापत बरी व्हायला अजून काही कालावधी लागेल. त्यामुळे मी स्पर्धेतून माघार घेत आहे,' असे नदालने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
एकूण १४ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावणाऱ्या नदालला कारकिर्दीत गुडघे व मनगटाच्या दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. मनगटाच्या दुखापतीमुळे त्याला २०१४ च्या यूएस ओपन स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते, तसेच २००९ मध्येही तो विम्बल्डन स्पर्धेला मुकला होता. २००८ व २०१० मध्ये नदालने विम्बल्डनचं विजेतेपद पटकावलं होतं.