'लाल' बादशाह यंदा फ्रेंच ओपन नाही खेळणार, राफेल नदाल २०२४ मध्ये कारकीर्दिचा शेवट करणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 11:35 PM2023-05-18T23:35:10+5:302023-05-18T23:35:46+5:30
'लाल' बादशाह राफेल नदालने फ्रेंच ओपन २०२३ स्पर्धेतून माघार घेतली आहे. गुरुवारी मोविस्टारच्या राफा नदाल अकादमीमध्ये त्याने ही घोषणा केली.
'लाल' बादशाह राफेल नदालने फ्रेंच ओपन २०२३ स्पर्धेतून माघार घेतली आहे. गुरुवारी मोविस्टारच्या राफा नदाल अकादमीमध्ये त्याने ही घोषणा केली. २००५मध्ये टूर्नामेंटमध्ये या स्पर्धेत पदार्पण केल्यानंतर १४वेळचा चॅम्पियन ठरलेला राफेल नदार प्रथमच फ्रेंच ओपन स्पर्धेत खेळणार नाही. २२वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या नदालने यावेळी २०२४ हे कदाचित त्याच्या कारकीर्दिचे शेवटचे वर्ष असेल, असे संकेतही दिले.
नदाल म्हणाला, "गेल्या चार महिन्यांपासून मी तंदुरुस्तीसाठी दररोज शक्य तितकी मेहनत घेत होतो. हे खूप कठीण महिने होते कारण मला ऑस्ट्रेलियात असलेल्या समस्येवर तोडगा काढता आला नाही. आज मी अजूनही अशा स्थितीत आहे की फ्रेंच ओपन स्पर्धेत खेळण्यासाठी मी स्वतःला तंदुरुस्त समजत नाही. फ्रेंच ओपनमध्ये सहभाग घेऊन फक्त खेळायचे म्हणून खेळत राहणारा मी व्यक्ती नाही. मला ते आवडतही नाही.''
३६ वर्षीय खेळाडूने जानेवारीत पार पडलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेनंतर त्याने अन्य सप्र्धेत सहभाग घेतला नाही. तिथे त्याला डाव्या पायाच्या स्नायूला दुखापत झाली होती. नदाल आणि त्याच्या संघाला सहा ते आठ आठवड्यांत तंदुरुस्त होण्याची अपेक्षा होती, परंतु तसे झालेले नाही. मागच्या वर्षी त्याने ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. पण, आता शारीरिक तंदुरुस्तीच्या समस्येमुळे खेळाचा आनंद लुटता येत नसल्याचे नदाल म्हणाला.
“साथीच्या रोगानंतर, माझे शरीर सराव करण्यास आणि दैनंदिन काम चांगल्या प्रकारे करण्यास सक्षम नव्हते. त्यामुळे मला सराव आणि स्पर्धेचा आनंद घेता आला नाही. खूप वेळा शारीरिक समस्यांमुळे थांबावे लागले आणि खूप वेदना झाल्या. म्हणून मी म्हटलं मला थांबायला हवे. मला थोडा वेळ थांबण्याची गरज आहे. त्यामुळे थांबण्याचा माझा निर्णय आहे. मला माहित नाही की मी प्रॅक्टिस कोर्टवर परत कधी येऊ शकेन, पण मी थोडा वेळ थांबणार आहे. कदाचित दोन महिने, कदाचित दीड महिना, कदाचित तीन महिने, कदाचित चार महिने,''असे नदाल म्हणाला.
"Right now, my thoughts go out to Rafa, as I can only imagine the pain and sadness he must be feeling after having to make such a hard decision. It’s heart-breaking." Amélie Mauresmo
— Roland-Garros (@rolandgarros) May 18, 2023
🗣️ https://t.co/EOiMFTGzSlpic.twitter.com/VE4bHJlaDa