राफेल नदालच्या आवाक्यात आले १९ वे विक्रमी ग्रँडस्लॅम जेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 02:36 AM2019-09-08T02:36:01+5:302019-09-08T06:57:28+5:30
यूएस ओपन टेनिस । रशियाच्या दानिल मेदवेदेवविरुद्ध खेळणार निर्णायक लढत
न्यूयॉर्क : स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल याने इटलीचा माटियो बेरेटिनीवर मात करीत यूएस ओपन टेनिसमध्ये पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली. विक्रमी १९ व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर नजर असलेल्या नदालला अंतिम फेरीत रशियाच्या दानिल मेदेवेदेव याचे आव्हान मोडित काढावे लागणार आहे.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या नदालने आर्थर अॅश स्टेडियममध्ये बेरेटिनीवर ७-६, ६-४, ६-१ ने विजय नोंदविला. दुसºया उपांत्य सामन्यात मेदवेदेवने बल्गेरियाचा ग्रिगोर दिमित्रोवचा ७-६, ६-४, ६-३ ने पराभव केला. नदालने यंदा येथे जेतेपद पटकविल्यास तो रॉजर फेडररच्या सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांच्या विश्वविक्रमापासून केवळ एक पाऊल दूर राहील. तो रविवारी २७ वा ग्रँडस्लॅम अंतिम लढतीत खेळेल. मागच्या महिन्यात नदालने माँट्रियल अंतिम फेरीत मेदवेदेवला पराभूत केले होते.
नदालला सत्राच्या प्रारंभी ढोपराला जखम झाली होती. त्यातून सावरताना त्याने १२ व्यांदा फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकविले. आता त्याची नजर चौथ्या अमेरिकन ओपन जेतेपदावर असेल. या स्पर्धेत फेडरर, पीट सॅम्प्रास आणि जिमी कोनोर्स यांनी प्रत्येकी पाच जेतेपदाचा मान मिळविला आहे.
मेदवेदेव २३ वर्षांचा असून प्रथमच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. मागच्या सहा आठवड्यात त्याचा रेकॉर्ड २० विजय आणि दोन पराभव असा राहिला. वॉशिंग्टन आणि कॅनडात तो उपविजेता राहिला. सिनसिनाटी ओपनचे त्याने जेतेपद पटकावले तर येथे अंतिम फेरीत दाखल झाला.
मेदवेदेव म्हणाला,‘अंतिम फेरी गाठल्याचा मोठा आनंद आहे. अमेरिकेत येत असताना अंतिम फेरीपर्यंत पोहोचेन याचा विचारही केला नव्हता.’मरात साफिन याने २००५ साली ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले होते. तेव्हापासून पुरुष ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठणारा मेदवेदेव रशियाचा पहिला खेळाडू ठरला. साफिनने २००० मध्ये येथे जेतेपदाचा मान मिळविला होता. त्यानंतर अंतिम फेरीमध्ये दाखल होण्याचा मान मेदवेदेवला मिळाला आहे.