रहाणे-धोनीचा खेळ संघासाठी की जागा टिकवण्यासाठी

By admin | Published: July 3, 2017 01:23 PM2017-07-03T13:23:41+5:302017-07-03T14:01:18+5:30

धोनी आणि रहाणे दोघांकडे पुरेसा अनुभव असून कुठल्या टप्प्याला खेळाचा गेअर बदलायचा हे दोघांना चांगले कळते. तरी, त्यांनी इतकी सावध, संभाळून फलंदाजी का केली ?

Rahane-Dhoni's game to keep the key for the team | रहाणे-धोनीचा खेळ संघासाठी की जागा टिकवण्यासाठी

रहाणे-धोनीचा खेळ संघासाठी की जागा टिकवण्यासाठी

Next

 ऑनलाइन लोकमत 

अँटिग्वा, दि. 3 - चौथ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजकडून झालेल्या पराभवामुळे पुन्हा एकदा भारतीय संघाच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कामगिरीमुळे रथी-महारथी खेळाडूंनी भरलेला भारतीय संघ कागदी वाघ असल्याचे दिसून आले. वेस्ट इंडिजच्या नवख्या, अननुभवी संघासमोर भारताला 190 धावांचे  सोपे लक्ष्य पार करता आले नाही. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर असला तरी, भारतीय संघाची कामगिरी उत्तम म्हणता येणार नाही. कारण भारत ज्या वेस्ट इंडिजच्या संघावर विजय मिळवतोय त्या संघात ख्रिस गेल, ब्राव्हो, मार्लन सॅम्युल्स, लेंडल सिमॉन्स आणि रसेल या बडया खेळाडूंचा समावेश नाहीय. 
 
चौथ्या वनडेमध्ये सांघिक कामगिरी चांगली झाली नाही असे म्हणता येणार नाही. कारण गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली होती. अजिंक्य रहाणे आणि महेंद्रसिंह धोनीचा अपवाद वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले असले तरी, रहाणे-धोनीने संघाची नौका किना-याला लावायला हवी होती. धोनीच्या 114 चेंडूत 54 धावा आणि रहाणेच्या 91 चेंडूत 60 धावांमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. धोनी आणि रहाणे दोघांकडे पुरेसा अनुभव असून कुठल्या टप्प्याला खेळाचा गेअर बदलायचा हे दोघांना चांगले कळते. तरी, त्यांनी इतकी सावध, संभाळून फलंदाजी का केली ?
 
रहाणेने संधी मिळाल्यानंतर चारही सामन्यात अर्धशतक फटकावली असली तरी, संघाच्या गरजेपेक्षा स्थान टिकवून धडपड त्यात जास्त दिसते. कारण संघात सध्या सलामीवीराच्या जागेसाठी चुरस आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा संघात परतल्यानंतर रहाणेला संपूर्ण स्पर्धेमध्ये बेंचवर बसून रहावे लागले होते. रहाणेकडे फलंदाजीचे उत्तम तंत्र आहे पण अनेक सामन्यांमध्ये रहाणेच्या फलंदाजीची गती मंदावत जाते हे दिसून आलेय. 
 
तिस-या वनडेमध्ये रहाणेने 72 धावा करण्यासाठी 112 चेंडू घेतले. सध्याचे वनडे क्रिकेट भरपूर फास्ट झाले आहे. तिथे कमी चेंडूमध्ये जास्त धावा करणा-या फलंदाजाला पहिली पसंती मिळते. जर तुम्ही खेळपट्टीवर स्थिरस्थावर होण्यासाठी जास्त चेंडू घेतले तर, तुम्ही शेवटपर्यंत मैदानावर टिकून विजय मिळवून द्याल अशी अपेक्षा तुमच्याकडून असणार. पण रहाणेच्या बाबतीत असे होत नाहीय. धोनी सुध्दा याच परिस्थितीतून जातोय. 
 
आणखी वाचा 
होल्डरचा पंच! अटीतटीच्या लढतीत भारत पराभूत
पराभवानंतर स्मिथची अजिंक्य रहाणेला "बिअर" ऑफर
 
धोनीला जागतिक क्रिकेटमध्ये बेस्ट फिनिशर समजले जाते. धावांचा पाठलाग करताना मोक्याच्या क्षणी धोनीने अनेक सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. पण रविवारी वेस्ट इंडिज विरुद्ध 190 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना धोनी सपशेल अपयशी ठरला. धोनी 48 व्या षटकापर्यंत मैदानावर होता. पण धोनीला संघाला विजय मिळवून देता आला नाही. धोनीने 114 चेंडूत 54 धावांची कासवछाप खेळी केली. भारतीय संघ आज जागतिक क्रिकेटमध्ये बलवान समजला जातो. पण विजयात सातत्य टिकवणे या संघाला जमत नाहीय. जर अशीच परिस्थिती राहिली तर, आपण 2019 वर्ल्डकप जिंकू शकतो का ? याचा विचार निवड समितीने करायला हवा. 

Web Title: Rahane-Dhoni's game to keep the key for the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.