रहाणेने तारले, चौथी कसोटी अनिर्णीत

By admin | Published: January 10, 2015 08:57 AM2015-01-10T08:57:12+5:302015-01-10T12:31:11+5:30

अजिंक्य रहाणेने टिच्चून केलेल्या ३८ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी कसोटी अनिर्णीत राखण्यात भारताला यश मिळाले आहे.

Rahane saved, fourth Test drawn | रहाणेने तारले, चौथी कसोटी अनिर्णीत

रहाणेने तारले, चौथी कसोटी अनिर्णीत

Next
>ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. १० - अजिंक्य रहाणेने टिच्चून केलेल्या ३८ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी कसोटी अनिर्णीत राखण्यात भारताला यश मिळाले आहे. रहाणेने भुवनेश्वर कुमारसह केलेल्या ७० चेंडूत ३५ धावांच्या भागीदारीमुळे भारताने पाचव्या दिवसाखेर ८९.५ षटकांत ७ गडी गमावत २५२ धावा केल्या आणि  अखेर ही कसोटी अनिर्णीत राहिली. 
ऑस्ट्रेलियाच्या ३४९ धावांचा पाठलाग करताना मुरली विजय (८०) आणि विराट कोहली (४६) यांनी चांगली खेळी करत भारताला विजयाच्या आशा दाखवल्या होत्या, पण इतर फलंदाजांनी टिकाव न धरल्याने भारत ही कसोटी गमवायच्या बेतात होता. मात्र अजिंक्य रहाणेने सावध खेळ करत ८८ चेंडूत ३८ धावा केल्या आणि ही कसोटी अनिर्णीत राखली. भारत २-० अशी मालिका हरला असला तरी शेवटच्या दोन कसोटी अनिर्णीत राखल्यामुळे भारताची काही प्रमाणात लाज राखली गेली आहे. 
चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात शानदार शतकी खेळी करणारा के.एल.राहुल (१६) व रोहित शर्मा (३९ ) हे भरवशाचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर मुरली विजयने कोहलीसह भारताच्या डावाला आकार दिला. मात्र ८० धावांवर खेळताना विजय हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर रैना (०) आणि सहा (०) हे दोघे भोपळाही न फोडता बाद झाले. विराट कोहली मैदानावर असल्याने भारताच्या जिंकण्याच्या आशा कायम होत्या. मात्र अर्धशतक पूर्ण होण्यापूर्वीच तो ४६ धावांवर बाद झाला आणि भारताची अवस्था बिकट झाली. अखेर रहाणेने टिकाव धरल्याने भारताने पाचव्या व अंतिम दिवसाचा डाव संपताना ७ गडी गमावत २५२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्क, लियॉन आणि हेझलवूडने प्रत्येकी २ तर वॉटसनने १ बळी टिपला.
 
 
 

Web Title: Rahane saved, fourth Test drawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.