रहाणे, विराट व ब्राव्हो यांच्यात चुरस

By admin | Published: May 19, 2015 01:37 AM2015-05-19T01:37:38+5:302015-05-19T01:37:38+5:30

राजस्थान रॉयल्सचा अजिंक्य रहाणे, रॉयल चॅलेंजर्सचा विराट कोहली व चेन्नई सुपरकिंग्सचा ड्वेन ब्राव्हो ‘मॅन आॅफ द टुर्नामेंट’च्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

Rahane, Virat, Bravo | रहाणे, विराट व ब्राव्हो यांच्यात चुरस

रहाणे, विराट व ब्राव्हो यांच्यात चुरस

Next

नवी दिल्ली : आयपीएलच्या आठव्या पर्वाने आता प्लेआॅफमध्ये प्रवेश केला असून, राजस्थान रॉयल्सचा अजिंक्य रहाणे, रॉयल चॅलेंजर्सचा विराट कोहली व चेन्नई सुपरकिंग्सचा ड्वेन ब्राव्हो ‘मॅन आॅफ द टुर्नामेंट’च्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
आयपीएलच्या आठव्या पर्वातील साखळी फेरी रविवारी संपली असून, चेन्नई सुपरकिंग्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांनी ‘प्ले आॅफ’मध्ये स्थान मिळवले आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई व मुंबई संघांदरम्यान लढत होणार असून, एलिमिनेटरमध्ये बेंगळुरू व राजस्थान संघ आमने-सामने असतील. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये चेन्नई व मुंबई संघांदरम्यानच्या लढतीतील पराभूत संघाला बेंगळुरू व राजस्थान संघांदरम्यानच्या लढतीतील विजेत्या संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
साखळी फेरीअखेर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर ५६२ धावांसह सर्वांत आघाडीवर होता, पण रविवारी पराभव स्वीकारावा लागल्यामुळे हैदराबाद संघ प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेला. त्यामुळे स्पर्धावीर पुरस्कारासाठी वॉर्नरच्या दावेदारीला धक्का बसला. राजस्थान रॉयल्सचा फलंदाज अजिंक्य रहाणे ४९८ धावांसह दुसऱ्या, बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली (४८१) तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे विराटचा संघसहकारी एबी डिव्हिलियर्स (४४६), चेन्नईचा ब्रॅन्डन मॅक्यलुम (४३६), बेंगळुरूचा ख्रिस गेल (४२३) व मुंबई कर्णधार रोहित शर्मा (४१३) हे फलंदाज शर्यतीत आहेत.
गोलंदाजांबाबत विचार करता चेन्नई संघाचा ब्राव्हो (२०) अव्वलस्थानी असून, युजवेंद्र चहल (१९) दुसऱ्या, मुंबई संघाचा लसित मलिंगा (१९) तिसऱ्या, बेंगळुरूचा मिशेल स्टार्क (१८) चौथ्या व चेन्नईचा आशिष नेहरा (१८) पाचव्या स्थानी आहे.
अष्टपैलू कामगिरीचा विचार करता ब्राव्हो (२० बळी, १२ झेल व १६६ धावा) सर्वांत आघाडीवर आहे. चेन्नई व मुंबईच्या खेळाडूंना पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभव स्वीकारावा लागला, तरी दुसरा क्वालिफायर खेळण्याची संधी मिळणार आहे. तर, बेंगळुरू व राजस्थानच्या खेळाडूंना एलिमिनेटर जिंकल्यानंतरच दुसरा क्वालिफायर खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे २४ मे रोजी
अंतिम फेरीत खेळणाऱ्या खेळाडूंना ‘मॅन आॅफ द टुर्नामेंट’चा पुरस्कार पटकावण्याची सर्वांत अधिक संधी राहणार आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Rahane, Virat, Bravo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.