राहुल आवारेचे पुण्यात परतल्यावर जोरदार स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 11:24 PM2019-09-24T23:24:33+5:302019-09-24T23:27:04+5:30
जागतिक स्पर्धेत जिंकले होते कांस्यपदक
पुणे : जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर आई-वडिलांनी केलेले कौतुक माझ्यासाठी स्पेशल आहे. जन्मदात्यांनी केलेल्या या कौतुकामुळे माझा उर अभिमानाने भरून आला, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया महाराष्ट्राला गुणवान मल्ल राहुल आवारे याने मंगळवारी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
कझाखस्तान येथील नूर सुलतान शहरात ही स्पर्धा नुकतीच झाली. यात फ्री स्टाईल प्रकारात ६१ किलो वजन गटामध्ये राहुलने कांस्यपदक पटकावले. या शानदार कामगिरीनंतर तो मंगळवारी संध्याकाळी पुण्यात परतला. यावेळी विमानतळावर त्याचे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत झाले. कुस्तीशौकिन, राहुल सराव करतो त्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील सहकारी, मित्र, कुस्ती संघटनेचे तसेच शासनाच्या क्रीडा विभागाचे पदाधिकारी यांनी विमानतळावर गर्दी केली होती.
या स्वागताने राहुल भारावून गेला होता. आपल्या भावना व्यक्त करताना तो म्हणाला, ‘‘कुस्ती हेच माझे सर्वस्व आहे. इतर खेळाडूंप्रमाणे मीदेखील प्रत्येक लढत जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावत असतो. यात कधी यश मिळते, तर कधी अपयश. यामुळे कधी कौतुक होते, तर कधी टीकेला सामोरे जावे लागते. खेळाडू म्हणून मी या दोन्ही गोष्टींना सहजपणे सामोरा जातो. मात्र, ज्यांचे रक्त माझ्या धमण्यांत वाहत आहे, त्या आईवडिलांनी कौतुक केल्यावर मला आकाश ठेंगणे झाले होते. त्यांच्या चेहºयावरील आनंद बघून जागतिक स्पर्धेत पदक जिंकल्याचे सार्थक झाल्याची भावना मझ्या मनात उमटली.’’
राहुलचे विमानतळावर आगमन होताच सर्वांनी त्याच्या नावाचा जयघोष केला. संकुलातील सहकाºयांनी त्याला उचलून घेत आपल्या लाडक्या खेळाडूचे स्वागत केले. विमानतळाहून निघाल्यानंतर राहुलने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर गोकुळ तालमीत जाऊन राहुलने आपले गुरू हिंदकेसरी हरिश्चंद्र बिराजदार यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. त्यानंतर दत्तनगर चौकातून जांभुळवारी रोडने आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलापर्यंत त्याची मिरवणूक काढण्यात आली.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, प्रशिक्षक काका पवार, राज्याचे क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, वस्ताद गोविंद पवार, गोकुळ तालमीचे वस्ताद व्यंकट परसे, राहुलचे वडील बाळासाहेब, आई शारदाबाई यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.
ऑलिम्पिक कोट्यासंदर्भातील निर्णय महासंघच घेईल
राहुलने जागतिक स्पर्धेत पदक जिंकलेला ६१ किलो वजनगट आँलिम्पिकमध्ये नाही. ५७ आणि ६४ किलो वजन गट आॅलिम्पिकमध्ये आहेत. राहुल यापूर्वी ५७ किलो वजन गटातून खेळलाय. मात्र, २०२०च्या आॅलिम्पिकसाठी ५७ किलो वजन गटातून रवी दहिया पात्र ठरला आहे. आॅलिम्पिक कोट्यासंदर्भात विचारले असता राहुल म्हणाला, जागतिक स्पर्धेतील यश अनपेक्षित आहे. आॅलिम्पिकला अद्याप एक वर्ष शिल्लक आहे. यासंदर्भात भारतीय कुस्ती महासंघ योग्य तो निर्णय घेईल. तोपर्यंत माझी तयारी सुरूच असेल.