महाराष्ट्राच्या राहुल आवारेची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 05:12 PM2019-03-17T17:12:35+5:302019-03-17T17:12:53+5:30
राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेची आगामी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
मुंबई : राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेची आगामी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत पदकाची लयलूट करून 2020च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी दावेदारी भक्कम करण्याची आवारेचा निर्धार आहे. पण, त्याला आशियाई स्पर्धेत 57 किलो गटाऐवजी 61 किलो वजनी गटातून या स्पर्धेत खेळावे लागणार आहे. हा निर्णय आपलाच असल्याचे, राहुलने स्पष्ट केले. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी बराच वेळ आहे आणि तोपर्यंत पुन्हा 57 किलो गटात आखाड्यात उतरू, असा विश्वास त्याने 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला.
Happy to have made the 🇮🇳 team for the 2019 Asian Wrestling Championship! Excited to compete and perform at this prestigious tournament 💪 pic.twitter.com/K8JY4NSDjK
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) March 17, 2019
राहुलने २००८ मध्ये युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले. पुढच्याच वर्षी त्याने कनिष्ठ आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले. जागतिक कनिष्ठ स्पर्धेतही त्याने रौप्यपदक जिंकले. त्यावेळी राहुलला 'लोकमत'च्या ' महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. मात्र त्याला पुरस्कार जिंकता आला नव्हता. २०१९ मध्ये मात्र त्याने या पुरस्कारावर नाव कोरले. नुकत्याच एका सोहळ्यात त्याला 'लोकमत'च्या ' महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्काराने गौरविण्यात आले.
त्यावेळी त्यानं ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचा निर्धार 'लोकमत'कडे व्यक्त केला होता. " ऑलिम्पिक स्पर्धेची निवड चाचणी स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार आहे. त्यात सर्वोत्तम कामगिरी करून ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत प्रवेश मिळवणे, हे पहिले लक्ष्य आहे. सुरुवातीला दिल्लीत आलो तेव्हा दडपण यायचे. सतत हरण्याचीच भीती वाटायची. पण आता येथील वातावरणाशी आणि 'डावपेचां'शी चांगलाच सरावलो आहे. जिद्दीने पुढे चालत राहायचं, मग कोणाला कितीही राजकारण खेळूदे,''असे मत त्याने व्यक्त केले होते.
राहुलने २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेत यंदा त्याला संधी मिळावी अशी मागणीही होत आहे. मागील ऑलिम्पिक स्पर्धा पात्रता फेरीसाठीच्या स्पर्धेत आलेला अनुभव विसरून राहुलला यंदा ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचा पताका डौलाने फडकवायचा आहे.
चीनमध्ये होणाऱ्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठीचा संघ
फ्री स्टाईल
रवी कुमार ( 57 किलो), राहुल आवारे ( 61 किलो), बजरंग पुनिया ( 65 किलो), रजनीश ( 70 किलो), अमित धनकर ( 74 किलो), प्रविण राणा ( 79 किलो), दीपक पुनिया ( 86 किलो), विकी ( 92 किलो), सत्यव्रत कॅडियन ( 97 किलो), सुमित ( 125 किलो);
ग्रेको रोमन
मनजीत ( 55 किलो), ग्यानेंदर ( 60 किलो), विक्रम कुमार ( 63 किलो), रवींदर ( 67 किलो), योगेश ( 72 किलो), गुरप्रीत सिंग ( 77 किलो), हरप्रीत सिंग ( 82 किलो), सुशील कुमार ( 87 किलो), हरदीप ( 97 किलो), प्रेम कुमार ( 130 किलो).
महिला संघ
सीमा ( 50 किलो), विनेश ( 53 किलो), ललिता सेहरावत ( 55 किलो), पूजा धांडा ( 57 किलो), मंजू ( 59 किलो), साक्षी मलिक ( 62 किलो), नवज्योत कौर ( 65 किलो), दिव्या काकरान ( 68 किलो), किरण ( 72 किलो), पूजा ( 76 किलो).