राहुल द्रविड होणार मुख्य प्रशिक्षक?
By admin | Published: April 4, 2016 02:26 AM2016-04-04T02:26:35+5:302016-04-04T02:26:35+5:30
प्रशिक्षकाचा शोध घेण्यासाठी बीसीसीआयने नेमलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने भारताचा दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड याला संघाचे मुख्य प्रशिक्षक व्हावे म्हणून गळ घातली
मुंबई : प्रशिक्षकाचा शोध घेण्यासाठी बीसीसीआयने नेमलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने भारताचा दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड याला संघाचे मुख्य प्रशिक्षक व्हावे म्हणून गळ घातली असून सर्व काही जुळून आल्यास मिस्टर डिपेेंडेबल राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा कोच असेल.
भारतीय क्रिकेट संघाचे निर्देशक म्हणून रवि शास्त्री यांचा करार टी-२0 विश्वचषकाबरोबर संपुष्टात आला आहे, त्यामुळे टीम इंडियाला आता नवीन कोच असावा अशी बीसीसीआयची इच्छा आहे. नव्या प्र्रशिक्षकाचा शोध घेण्याची जबाबदारी सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीकडे देण्यात आली आहे.
या समितीची बैठक मंगळवारी होणार असून त्यांनी या पदासाठी राहुल द्रविडकडे संपर्क साधला असून त्याचा निर्णय विचारला आहे. राहुलने त्यांना अद्याप होकार दिला नसला तरी तो मंगळवारपर्यंत आपला होकार कळविण्याची शक्यता आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
रवि शास्त्री हे संघासोबत निर्देेशक म्हणून कायम राहण्यास इच्छुक असल्याचे समजते, परंतु मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांना जबाबदारी नको आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दुसरीकडे संघाला आता पूर्णवेळ प्रशिक्षक असावा, अशी बीसीसीआयची भूमिका आहे. मुख्य प्रशिक्षक आणि निर्देशक ही दोन्ही पदे एकावेळी संघात नसतील, हे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकुर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.