दिव्यांगांच्या वर्ल्ड कपमध्ये तिरंगा फडकला! राहुल जाखरने जिंकले सुवर्ण, तर अवनी लेखाराला रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 02:40 PM2022-08-18T14:40:14+5:302022-08-18T14:40:41+5:30
चँगवॉन येथे सुरू असलेल्या पॅरा नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत ( Para Shooting World Cup) भारताच्या राहुल जाखरने मिश्र २५ मीटर पिस्तुल SH1च्या अंतिम फेरीत रोमहर्षक विजय मिळवला.
चँगवॉन येथे सुरू असलेल्या पॅरा नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत ( Para Shooting World Cup) भारताच्या राहुल जाखरने मिश्र २५ मीटर पिस्तुल SH1च्या अंतिम फेरीत रोमहर्षक विजय मिळवला. जुंगनॅमविरुद्धच्या फायनलमध्ये १९-१५ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना राहुलने दोन वेळा लढत टाय केली आणि तिसऱ्या सीरिजमध्ये अचूक निशाणा साधून सुवर्णवेध घेतला. याच गटात पूजा अगरवालने १४ गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली.
१० मीटर एअर पिस्तुल SH1 या गटाच्या जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर असलेल्या राहुलने टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेतही सहभाग घेतला होता. २०१८च्या आशियाई पॅरा स्पर्धेत P4- मिश्र 50मीटर फ्री पिस्तुल प्रकारातही त्याने सहभाग घेतला होता. टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती अवनी लेखारानेही वर्ल्ड कप स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. लंडनच्या युनरी लीने महिलांच्या १० मीटर AR Standing SH1 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. अवनीला २४७.८ गुणांची कमाई करता आली.
पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू आहे. २०१२मध्ये ११ वर्षांची असताना कार अपघातात तिला अपंगत्व आले. त्यानंतर वडिलांनी तिला खेळात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. सुरुवातीला तिने तिरंदाजीची निवड केली होती, परंतु त्यानंतर ती नेमबाजीकडे वळली.