आॅस्ट्रेलिया-बांगलादेश लढतीवर ‘पाऊस’
By admin | Published: February 21, 2015 11:46 PM2015-02-21T23:46:13+5:302015-02-21T23:46:13+5:30
आॅस्ट्रेलिया- बांगलादेश यांच्यातील शुक्रवारच्या विश्वचषकाच्या ‘अ’ गटातील लढत पावसात वाहून गेली.
ब्रिस्बेन : आॅस्ट्रेलिया- बांगलादेश यांच्यातील शुक्रवारच्या विश्वचषकाच्या ‘अ’ गटातील लढत पावसात वाहून गेली. क्वीन्सलँडच्या किनाऱ्यावर मर्सिया नावाचे चक्रीवादळ धडकल्याने येथे
पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे सामन्यात एकही चेंडू टाकता आला नाही.
या सामन्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून शंका उपस्थित केली जात होती. पण, आयोजकांनी कमी षटकांचा सामना खेळविण्यासाठी कंबर कसली. स्थानिक वेळेनुसार सामना २.३० पासून सुरू होणार होता. पण, मैदान ओले असल्याने उशीर झाला. अखेर सायंकाळी ४.४५ ला (भारतीय वेळ दुपारी १२.१५) सामना रद्द केल्याची घोषणा झाली. उभय कर्णधार नाणेफेकीसाठीदेखील येऊ शकले नाही. उभय संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. आॅस्ट्रेलियाला १९ पैकी १८ सामने गमावणाऱ्या बांगलासंघाला याचा लाभ मिळणार आहे.
या सामन्याद्वारे आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याचे मैदानावर पुनरागमन होणार होते. पण, सामना रद्द झाल्याने त्याला आठवडाभर प्रतीक्षा करावी लागेल. आॅस्ट्रेलियाला पुढील सामना न्यूझीलंडविरुद्ध आॅकलंड येथे खेळावा लागेल. या सामन्यावरदेखील पावसाचे सावट आहे. बांगलादेश दोन दिवसाआधी अर्थात २६ फेब्रुवारी रोजी मेलबोर्नमध्ये लंकेविरुद्ध खेळेल. (वृत्तसंस्था)