दुसऱ्या कसोटीवर पावसाचे सावट
By admin | Published: November 12, 2016 01:29 AM2016-11-12T01:29:35+5:302016-11-12T01:29:35+5:30
आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवणारा दक्षिण आफ्रिका संघ शनिवारपासून प्रारंभ होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चार वेगवान गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता आहे.
होबार्ट : आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवणारा दक्षिण आफ्रिका संघ शनिवारपासून प्रारंभ होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चार वेगवान गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता आहे. या लढतीवर पावसाचे सावट आहे.
दक्षिण आफ्रिकेने दोन वेगवान गोलंदाज व एका फिरकीपटूच्या मदतीने पर्थ कसोटी सामन्यात १७७ धावांनी विजय मिळवला होता. या लढतीत वेगवान गोलंदाज डेल स्टेन दुखापतग्रस्त झाला होता. फिरकीपटू केशव महाराजने पदार्पण केले. त्याने पहिल्या डावात तीन तर दुसऱ्या डावात एक बळी घेतला होता.
सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना कर्णधार फॅफ ड्युप्लेसिस म्हणाला, ‘आम्ही चार वेगवान गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता आहे. पावसाच्या व्यत्ययाचाही आम्ही विचार केला अहे. शनिवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शनिवारी जर दिवसभर पाऊस असेल तर चार दिवसांचा सामना आयोजित करण्यावर विचार होईल. होबार्टमध्ये सामन्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा स्थितीत उभय संघाच्या विजय मिळवण्याच्या आशेवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका संघाला स्टेनच्या स्थानी मोर्न मोर्केल किंवा केली एबोटचा समावेश करण्याची संधी आहे. दरम्यान, प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांच्या मते होबार्ट कसोटीपूर्वी मोर्कलची फिटनेस चाचणी घ्यावी लागेल. कर्णधाराने अद्याप याबाबत काही स्पष्ट केले नसले तरी खेळपट्टीचे स्वरुप बघितल्यानंतर एबोटचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे.
ड्युप्लेसिस म्हणाला, ‘आम्ही परिस्थिती ओळखून बलाढ्य संघाची निवड करण्यास प्रयत्नशील आहोत.’