रिओस्टार्स सिंधू, साक्षी आणि दीपावर बक्षिसांचा वर्षाव
By admin | Published: August 21, 2016 06:30 AM2016-08-21T06:30:46+5:302016-08-21T06:30:46+5:30
रिओमध्ये बॅडमिंंटन महिला एकेरीचे रौप्यपदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू, महिला कुस्तीत कांस्य विजेती साक्षी मलिक तसेच ५२ वर्षांत भारताला पहिल्यांदा जिम्नॅस्टिकमध्ये सन्मान
नवी दिल्ली : रिओमध्ये बॅडमिंंटन महिला एकेरीचे रौप्यपदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू, महिला कुस्तीत कांस्य विजेती साक्षी मलिक तसेच ५२ वर्षांत भारताला पहिल्यांदा जिम्नॅस्टिकमध्ये सन्मान मिळवून देणारी दीपा करमाकर यांच्यावर देशातून विविध स्तरांवर पुरस्कारांचा वर्षाव सुरूच आहे. भारतीय मुलींच्या कौतुकास ‘दाद’ म्हणून रोख रक्कम आणि भेटवस्तूंच्या स्वरूपात दोघींचीही पाठ थोपटली जात आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंधूला दोन कोटी रुपये रोख पुरस्कार देण्याची घोषणा केली. आॅलिम्पिक रौप्य जिंकणारी पहिली महिला बॅडमिंटनपटू या नात्याने सिंधूचा योग्य सन्मान करण्यासाठी ही रक्कम देत असल्याचे केजरीवाल यांनी टिष्ट्वट केले. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी महिला मल्ल साक्षी मलिकला सरकारकडून एक कोटी रुपये रोख देण्याची घोषणा केली. साक्षीच्या आईवडिलांची भेट घेण्यासाठी सिसोदिया रोहतक येथील साक्षीच्या घरी गेले होते. तेथेच त्यांनी ही घोषणा केली. त्यांनी साक्षीच्या वडिलांना पदोन्नती देण्याचीही घोषणा केली.
वाहन निर्माती कंपनी असलेल्या निसानने रिओ आॅलिम्पिकमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या सिंधू, साक्षी आणि दीपा या तिन्ही कन्यांना डॅटसन रेडी गो कार भेट देण्याची घोषणा केली आहे. निसान मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक अरुण मल्होत्रा यांनी ही घोषणा करताना सांगितले की, भारतीय मुलींच्या कामगिरीवर निसानला गर्व आहे.
सलमानने रिओमध्ये सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंना प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस देण्याची नुकतीच घोषणा केली आहे. यापुढे सिंधू बीपीसीएलमध्ये उपव्यवस्थापक म्हणून काम करेल, अशी घोषणा बीपीसीएलचे सीएमडी एस. वरदराजन यांनी केली. सिंधू १४ वर्षांची असतानापासून बीपीसीएलने तिला शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दत्तक घेतले होते. (वृत्तसंस्था)
- 75लाखांचा रोख पुरस्कार आणि पदोन्नती पी. व्ही. सिंधूला देण्याची घोषणा बीपीसीएलने केली आहे.
तिघींबरोबर ललितालाही रोख पुरस्कार
हरियाणा सरकारने साक्षीसोबतच सिंधू, दीपा कर्माकर आणि ललिता बाबर यांचा यथोचित सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधूला ५० लाख रोख, तर दीपा आणि ललिता यांना प्रत्येकी १५ लाखांचा रोख पुरस्कार दिला जाईल. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राज्याबाहेरील मुलींनादेखील पुरस्कार दिल्यामुळे देशातील मुलींना चांगली कामगिरी करीत देशाचे नाव उंचावण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
आंध्रकडून सिंधूला तीन कोटी, क्लास वन नोकरी
विजयवाडा : तेलंगणा आणि आंध्र प्रदेश सरकारने सिंधूला तीन कोटी
रुपये रोख आणि क्लास वन नोकरी देण्याची घोषणा केली. राज्याची नवी राजधानी अमरावती येथे तिला एक हजार चौरस फूट जमीन आणि प्रशिक्षक गोपीचंद यांना ५० लाख रुपये रोख दिले जातील, असे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी जाहीर केले.