आॅस्ट्रेलियाला पावसाचा फटका
By Admin | Published: June 6, 2017 07:05 AM2017-06-06T07:05:49+5:302017-06-06T07:05:49+5:30
पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे बांगलादेश आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील सामना अखेर अनिर्णीत राहिला.
लंडन : पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे बांगलादेश आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील सामना अखेर अनिर्णीत राहिला. दोन्ही संंघांना एकेक गुण देण्यात आला. यामुळे आॅस्ट्रेलियाची गुणतालिकेतील स्थिती बिकट बनली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीत सोमवारी तमीम इकबालच्या झुंजार खेळीनंतरही मिशेल स्टार्कच्या भेदक माऱ्याच्या बळावर आॅस्ट्रेलियाने बांगलादेशला ४४.३ षटकांत १८२ धावांत गुंडाळले. या आव्हानाचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाने १६ षटकांत १ बाद ८३ धावा केल्या होत्या. त्यावेळी पावसाला सुरवात झाली. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १.५0 मिनिटांनी पंचांनी हा सामना रद्द करीत असल्याचे घोषित केले. दोन्ही संघांना एकेक गुण देण्यात आला. आॅस्ट्रेलियाचा न्यूझीलंडविरुध्दचा पहिला सामनाही पावसामुळे अनिर्णीत राहिला होता. दोन्ही सामन्यात मिळून त्यांचे आता केवळ दोन गुण झाले असल्याने सेमीफायनल गाठण्याची त्यांची वाट बिकट बनली आहे.
तत्पूर्वी, बांगलादेशकडून तमीम इकबाल याने सर्वाधिक ११४ चेंडूंत ६ चौकार, ३ षट्कारांसह ९५ व शाकीब अल हसनने ४८ चेंडूंत २ चौकारांसह २९ धावा केल्या. या दोघांशिवाय मेहदी हसन मिराज (१४) हाच दुहेरी आकडी धावा फटकावू शकला. आॅस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने २९ धावांत ४ गडी बाद केले. अॅडम झम्पाने २ बळी घेतले.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला; परंतु हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. त्यांची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांनी १६.२ षटकांतच सलामीवीर सौम्या सरकार (३), इमरुल केज (६) आणि मुशफिकर रहीम (९) हे धावफलकावर अवघ्या ५३ धावा असतानाच गमावले. हेजलवूडने सौम्या सरकारला यष्टिरक्षक वाडेकरवी ३ धावांवर झेलबाद केले, तर इमरुल केजला कमिन्सने व मुशफिकर रहीमला हेनरिक्सने तंबूत धाडले. एका बाजूने किल्ला लढवणाऱ्या तमीम इकबालला अनुभवी शकीब अल हसन याने चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी १३.३ षटकांत ६९ धावांची भागीदारी करताना बांगलादेशची पडझड थोपवली; परंतु फिरकी गोलंदाज टीम हेडने शकीब अल हसन याला पायचीत करताना आॅस्ट्रेलियाला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर फलंदाजीस आलेले शब्बीर रहमान (८), महमुदुल्लाह (८) तमीमला साथ देऊ शकले नाहीत. त्यातच मिशेल स्टार्कने त्याच्या वैयक्तिक आठव्या आणि डावाच्या ४३ व्या षटकांत शतकाकडे वाटचाल करणाऱ्या तमीमला पहिल्या, मुशरफे मोर्तजाला तिसऱ्या आणि रुबेल हुसेनला चौथ्या चेंडूंवर बाद करीत बांगलादेशच्या आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याच्या उरल्यासुरल्या आशेला सुरुंग लावला. त्यानंतर पुढच्या षटकांत स्टार्कने मेहदी हसनला बाद करीत बांगलादेशच्या डावाला पूर्णविराम दिला.
>संक्षिप्त धावफलक
बांगलादेश : ४४.३ षटकांत सर्वबाद १८२. (तमीम इकबाल ९५, शाकीब अल हसन २९, मेहदी हसन मिराज १४. मिशेल स्टार्क ४/२९, अॅडम झम्पा २/१३).