राजस्थानच रॉयल...
By admin | Published: April 11, 2015 04:35 AM2015-04-11T04:35:38+5:302015-04-11T04:35:38+5:30
जेम्स फॉल्कनरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने शुक्रवारी आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर २६ धावांनी मात करून विजयी सलामी दिली
विशाल शिर्के, पुणे
जेम्स फॉल्कनरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने शुक्रवारी आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर २६ धावांनी मात करून विजयी सलामी दिली. राजस्थानने विजयासाठी दिलेले १६३ धावांचे आव्हानदेखील पंजाबला पेलवले नाही. त्यांना २० षटकांत ८ बाद १३६ धावाच करता आल्या. जेम्स फॉल्कनरने ४६ धावा केल्या आणि ३ बळी घेत सामनावीराचा पुरस्कार मिळविला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) मैदानावर शुक्रवारी गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. होम ग्राऊंड असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार जॉर्ज बेलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवून पंजाबने राजस्थानच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले. धावा रोखताना विकेट घेण्याची कामगिरीदेखील गोलंदाजांनी केली. मात्र स्टीवन स्मिथ (२३ चेंडूत ३३ धावा), दीपक हुडा (१५ चेंडू ३० धावा) व जेम्स फॉल्कनर (३२ चेंडूत ४६ धावा) यांनी उत्कृष्ट फलंदाजी करीत संघाचा धावफलक १६२ वर नेण्यात मोलाची भूमिका बजावली.
या माफक आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग (०) टीम साऊदीच्या पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनकडे झेल देऊन परतला. त्यानंतर मुरली विजय व रिद्धिमान साहा यांनी खेळाची सूत्रे हाती घेतली. मात्र तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर सॅमसनने साहाला धावबाद केले. पाठोपाठ धोकादायक ठरु शकणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलचा (७) अडसर जेम्स फॉल्कनरने दूर केला. मॅक्सवेल साऊदीकडे झेल देवून परतला. त्यामुळे पंजाबची अवस्था ३ बाद ४६ अशी झाली. एकाबाजूने खिंड लढविणारा मुरली विजय (३२ चेंडंूत ३७ धावा) चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. त्यापूर्वी विजयने ४ चौकार व एका षटकाराच्या सहाय्याने आपली खेळी साजरी केली. अक्षर पटेल (२४) याला टीम साऊदीने त्रिफळाबाद करीत केले. पाठोपाठ मिचेल जॉन्सनला फॉल्कनरने भोपळाही फोडू दिला नाही. त्यांनतर जॉर्ज बेलीला (१८ चेंडूत २४ धावा) फॉल्कनरने त्याच षटकांत तंबूत धाडले. सीमारेषेपलीकडे जाणारा उत्तुंग फटका टीम साउदीने मैदानात फेकला. तितक्या चपळाईने नायरने झेल टिपत बेलीला झेलबाद केले आणि पंजाबच्या विजयाच्या आशाही संपुष्टात आल्या.