रोमहर्षक लढतीत राजस्थान रॉयल्स विजयी
By admin | Published: April 12, 2015 05:38 PM2015-04-12T17:38:35+5:302015-04-12T19:39:22+5:30
दिपक हुडाच्या झंझावाती अर्धशतकाने अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली डेअर डेव्हिल्सवर तीन विकेट्सनी विजय मिळवला.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - दिपक हुडाच्या 25 चेंडूत 54 धावांची तुफानी खेळी व अजिंक्य रहाणेच्या 47 धावांच्या खेळीने राजस्थान रॉयल्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 3 विकेट्सने विजय मिळवला. दिल्लीचे 185 धावांचे लक्ष्य राजस्थानने 20 षटकांत 7 गडी गमावून गाठले.
रविवारी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल विरुद्ध राजस्थान रॉयल्स हे संघ आमने सामने आहेत. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीने राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 185 धावांचे आव्हान ठेवले होते. संजू सॅमसन, स्टिव्हन स्मिथ, करण नायर व स्टुअर्ट बिन्नी हे आघाडीचे फलंदाजी स्वस्तात बाद झाल्याने राजस्थानची अवस्था 4 बाद 78 अशी झाली होती. मात्र सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि दिपक हुडा या जोडीने संयमी खेळी करत राजस्थानचा डाव सावरला. या जोडीने 52 धावांची भागीदारी रचली.रहाणे 47 धावांवर बाद झाल्यावर हुडाने फॉल्कनर 36 धावांची छोटी पण महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. दिल्लीचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरने हुडा व फॉल्कनर या दोघांना लागोपाठ बाद केल्याने सामन्याला कलाटणी मिळाली. शेवटच्या षटकांत राजस्थानला 12 धावांची गरज होती. अँजेलो मॅथ्यूजच्या या निर्णायक षटकात टीम साऊदी व मॉरिस या दोघांनी 12 धावा चोपून संघाला दिमाखदार विजय मिळवून दिला. ढिसाळ क्षेत्ररक्षण हे दिल्लीच्या पराभवाचे एक महत्त्वाचे कारण ठरले.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करणा-या दिल्लीची सुरुवात चांगली होती. सलामीवीर मयांक अग्रवाल आणि श्रेयस अय्यर यांनी दिल्लीला चांगली सुरुवात करुन दिली. पण मयांक 37 धावांवर असताना प्रवीण तांबेने त्याला झेलबाद केले. यानंतर तिस-या क्रमांकावर आलेल्या ड्यूमिनीने अय्यरच्या साथीने दिल्लीचा डाव पुढे नेला. अय्यरने फटकेबाजीला सुरुवात केल्याने दिल्ली मोठी धावसंख्या उभारेल असे चित्र होते. पण मॉरिसने त्याला 40 धावांवर असताना बाद केले. आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला युवराज सिंग आज फॉर्मात दिसत होता. त्याने सुरेखफटकेबाजी केली. पण मॉरिसच्या चेंडूवर षटकार ठोकण्याच्या नादात युवराज झेलबाद झाला. सीमारेषेवर करुण नायरने अप्रतिम झेल टिपला. युवराजने 17 चेंडूत 27 धावा केल्या. अँजेलो मॅथ्यूजनेही 14 चेंडूत 27 धावांची नाबाद खेळी केली. तर ड्यूमिनीने 38 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या.