राकेशकडे मुंबईची धुरा
By admin | Published: February 9, 2016 01:48 AM2016-02-09T01:48:44+5:302016-02-09T01:48:44+5:30
गतविजेत्या बलाढ्य यू मुंबा संघाची कामगिरी यंदाच्या प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात लौकिकास साजेशी झाली नाही. चार सामन्यांतून दोन विजय आणि दोन पराभव अशी कामगिरी
- रोहित नाईक, कोलकाता
गतविजेत्या बलाढ्य यू मुंबा संघाची कामगिरी यंदाच्या प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात लौकिकास साजेशी झाली नाही. चार सामन्यांतून दोन विजय आणि दोन पराभव अशी कामगिरी झालेल्या मुंबईला आता कोलकाता येथे होणाऱ्या बंगळुरु बुल्स विरुध्द स्टार खेळाडूंच्या अनुपस्थित खेळावे लागेल.
सध्या सुरु असलेल्या दक्षिण आशीयाई क्रीडा स्पर्धेत (सॅग) यू मुंबाचे सर्वाधिक ४ खेळाडू राष्ट्रीय संघात असून मुंबईचा कर्णधार अनुप कुमारकडे भारतीय संघाची धुरा सोपविण्यात आली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भारताचा माजी कर्णधार आणि संघाचा नवा सदस्य राकेश कुमार यू मुंबाचे नेतृत्त्व करेल असे अनुपने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पहिले दोन पर्व पटणा पायरेट्सचा कर्णधार असलेला राकेश यंदा मुंबईकर झाला. मात्र त्याला म्हणावी तशी छाप पाडता आली नाही. याविषयी अनुप म्हणाला, राकेश स्टार आहे. तो सुरुवातीला अपेक्षित खेळू शकला नसला तरी आमच्या अनुपस्थिमध्ये त्याच्यावर काहीप्रमाणात दडपण येईल आणि दडपणात त्याचा खेळ हमखास उंचावतो. त्यामुळे लवकरच राकेशचा दमदार खेळ सर्वांना दिसेल. शिवाय त्याच्याकडे भारताच्या कर्णधारपदाचा दीर्घ अनुभव असून त्याचा फायदा नक्कीच यू मुंबाला होईल. त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाचा खेळ बहरेल.
यंदाची सुरुवात निश्चित अपेक्षेप्रमाणे झाली नसली, तरी आम्ही सराव शिबीरामध्ये पहिल्या चार सामन्यात झालेल्या चुका सुधारण्यावर भर दिला. सर्वच खेळाडूंनी कसून सराव केला असल्याने कोलकाता येथील सामन्यापासून यू मुंबाचा हिसका दिसून येईल, असा विश्वासही अनुपने व्यक्त केला.
‘सॅग’ स्पर्धेत काशिलिंग आडके, रोहित कुमार, सुरेंद्र, संदीप नरवाल, राहूल चौधरी यांसारखे स्टार खेळाडूही भारतीय संघात असल्याने त्याचाही स्पर्धेवर परिणाम होईल असे सांगताना अनुप म्हणाला की, नक्कीच या खेळाडूंच्या अनुपस्थितीचा प्रत्येक संघावर परिणाम होईल. मात्र तरीही कोणताच संघ कमजोर नसेल. प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम कमगिरीच्या प्रयत्नात असल्याने स्पर्धेतील चुरस कमी होणार नाही आणि मुंबईकरही यामध्ये चमकदार कामगिरी करतील.
पाकिस्तानचे भारतासमोर आव्हान
- सॅफ आणि प्रो कबड्डीची तयारी एकाचवेळी सुरु होती. सॅफ स्पर्धेत भारतीय संघ अत्यंत मजबूत असून विजेतेपदासाठी विशेष आव्हान नसेल. मात्र तरीही पाकिस्तान संघाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यांचा संघ दमदार असून भारतासमोर त्यांचेच मुख्य आव्हान असेल.
- भारताच्या कर्णधारपदाचे माझ्यावर कोणतेही दडपण नाही. मी नेहमीप्रमाणेच कोणत्याही दडपणाशिवाय खेळेन. संघातील प्रत्येक खेळाडू विजेतेपद उंचावण्यास सज्ज असल्याचे अनुप कुमारने सांगितले.