‘रामचंद्रन हटाव’ मुद्द्यावर फूट?
By admin | Published: June 17, 2015 02:12 AM2015-06-17T02:12:36+5:302015-06-17T02:12:36+5:30
भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन यांना पदावरून दूर करण्यासाठी अविश्वास आणण्याची मागणी
नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन यांना पदावरून दूर करण्यासाठी अविश्वास आणण्याची मागणी करणाऱ्या क्रीडा संघटकांमध्ये फूट पडल्याची चिन्हे दिसत आहेत. हा मुद्दा आता संपला असल्याचे मत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त करताच ‘कुठे तरी पाणी मुरले असावे,’ असा अर्थ काढण्यात येत आहे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी रामचंद्रन हटाव मोहीम सुरू केली. अनेक राष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि राज्य आॅलिम्पिक संघटनांनी त्यांच्या मोहिमेला बळ देऊन जाहीर पाठिंबा दिला होता. विशेष आमसभा लवकरात लवकर बोलावण्याची मागणीदेखील सातत्याने होऊ लागली होती. तथापि, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या महिन्याच्या अखेरीस आयओएच्या एका गटाने अनौपचारिक बैठक बोलावली होती. या बैठकीत आयओएचे माजी अध्यक्ष अभयसिंह चौटाला आणि सचिव ललित भानोत यांनी या सदस्यांना बत्रा यांच्या मोहिमेत सहभागी होऊ नका, असे बजावले. आयओएच्या एका अधिकाऱ्याच्या मते, रामचंद्रन हटाव मोहीम आता संपली आहे. रामचंद्रन हटाव मोहिमेस बळ दिल्यास परिस्थिती चिघळेल. शिवाय, विशेष आमसभा बोलावली, तरी रामचंद्रन यांचे काहीही वाकडे होऊ शकणार नसल्याची जाणीव चौटाला तसेच भानोत यांनी सदस्यांना करून दिली.’’ बत्रा यांनीदेखील मंगळवारी सर्व नाराज संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना ई-मेल पाठवून भारतीय अॅथलेटिक्स संघटनेनेदेखील रामचंद्रन हटाव मोहिमेस पाठिंबा दिल्याची आठवण करून दिली. शिवाय, ५० टक्क्यांहून अधिक महासंघ आणि राज्य संघटनांचा पाठिंबा असल्याने विशेष आमसभा बोलावण्यावर भर दिला. दरम्यान, अॅथलेटिक्स महासंघाच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले, की महासंघाने रामचंद्रन यांच्या कार्यशैलीशी संबंधित मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावण्याची मागणी केली होती; रामचंद्रन यांना हटविण्यासाठी नव्हे! रामचंद्रन यांच्या कार्यशैलीवरून जे मुद्दे पुढे आले, त्यावर आम्ही तोडगा काढण्याची मागणी केली; त्यांचा राजीनामा मागितला नव्हता. (वृत्तसंस्था)