नेमबाजी संघ निवड प्रक्रियेत हेराफेरी - राणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 05:06 AM2018-09-22T05:06:59+5:302018-09-22T05:07:04+5:30
१६ वर्षांचा आशियाई सुवर्ण विजेता सौरभ चौधरी याला वर्षभर राष्ट्रीय संघातून बाहेर बसावे लागले,’ असा दावा ज्युनियर राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक जसपाल राणा यांनी केला आहे.
नवी दिल्ली : ‘मर्जीतील खेळाडूला लाभ पोहोचविण्यासाठी निवड प्रक्रियेत मनमानी बदल केल्यामुळे १६ वर्षांचा आशियाई सुवर्ण विजेता सौरभ चौधरी याला वर्षभर राष्ट्रीय संघातून बाहेर बसावे लागले,’ असा दावा ज्युनियर राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक जसपाल राणा यांनी केला आहे.
सौरभ हा मेरठजवळच्या कलिना गावातील शेतकरी कुटुंबातील आहे. त्याने इंडोनेशियात नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अनेकवेळा आॅलिम्पिक आणि विश्व चॅम्पियन राहीलेल्या नेमबाजांना मागे टाकून सुवर्ण जिंकले. आशियाई स्पर्धेत देशासाठी सर्वांत लहान वयाचा तो सुवर्ण विजेता बनला.
माजी नेमबाज जसपाल म्हणाले, ‘एनआरएआयमधील (राष्टÑीय रायफल महासंघ) काही प्रभावशाली व्यक्तींनी स्वार्थासाठी निवड धोरणात बदल केल्यामुळे सौरभला वर्षभर बाहेर रहावे लागले.’ जसपाल पुढे म्हणाले, ‘सिनियर गटातही सौरभ देशाचा आघाडीचा नेमबाज होता.तो जितू रायच्या तुलनेत सरस होता.‘ग्रिप’योग्य नसल्याचे कारण देत एका स्पर्धेत सौरभला अपात्र ठरविण्यात आले. या प्रकरणी मला दखल द्यावी लागली. काही कोचेससोबत बोलणे झाल्यानंतर त्याची अपात्रता रद्द ठरविण्यात आली.’
आशियाई स्पर्धेच्या चाचणीतही सौरभने जितूपेक्षा अधिक गुणांची कमाई केली होती. विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्य विजेत्या जितूला ‘आॅलिम्पिक गोल्ड क्वेस्ट’चे आर्थिक पाठबळ मिळाले आहे. खेळाडूंचे ‘टॅलेंट’ पैसा आणि प्रभाव या गोष्टींच्या आड दडपले जावू नये, असे माझे ठाम मत असल्याचे जसपाल म्हणाले. (वृत्तसंस्था)
>युवा नेमबाजांना बराच पल्ला गाठायचा आहे. यश- अपयश, कटू अनुभव यातून जाताना युवा नेमबाज आणखी भक्कम होतील, असा विश्वास व्यक्त करीत राणा यांनी नेमबाजांच्या पालकांना खेळासाठी प्रोत्साहन देणे कायम ठेवावे, असे आवाहन केले. जसपाल यांनी मनू भाकर, अनीश भानवाला आणि सौरभ चौधरीसारख्या युवा नेमबाजांना विश्व स्तरावर पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.