राणा घेणार नरसिंगची जागा?

By admin | Published: July 28, 2016 04:10 AM2016-07-28T04:10:29+5:302016-07-28T04:10:29+5:30

रिओ आॅलिम्पिकपासून वंचित राहिलेला मल्ल नरसिंग यादव याने केलेल्या कथित कटाच्या आरोपाला बुधवारी नाट्यमय वळण मिळाले. खुद्द नरसिंगने आपल्या जेवणात दोन मल्लांनी

Rana to take place of Narang? | राणा घेणार नरसिंगची जागा?

राणा घेणार नरसिंगची जागा?

Next

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकपासून वंचित राहिलेला मल्ल नरसिंग यादव याने केलेल्या कथित कटाच्या आरोपाला बुधवारी नाट्यमय वळण मिळाले. खुद्द नरसिंगने आपल्या जेवणात दोन मल्लांनी प्रतिबंधित स्टेरॉईड मिसळल्याची तक्रार पोलिसांत केली. सोनिपत ठाण्यात त्याने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये दोन मल्लांची नावेदेखील दिली. त्यातील एक मल्ल १७ वर्षांचा आहे. याप्रकरणी सीबीआय चौकशीची व्हावी, या मागणीचा त्याने पुनरुच्चारही केला.
भारतीय कुस्ती महासंघानेदेखील नरसिंगला पाठिंबा कायम ठेवला असून, नरसिंग रिओला जाणार नसेल तर त्याच्या जागी प्रवीण राणा याला पाठविले जाईल. युनायटेड विश्व कुस्तीने राणाच्या नावाला मंजुरी दिल्याचे म्हटले आहे.
तक्रार दाखल केल्यानंतर पत्रकारांना माहिती देत नरसिंग म्हणाला,‘माझ्याविरुद्ध कट रचला गेला असे मी नेहमी म्हटले आहे, आरोपमुक्त झाल्यास मी रिओला जाईन. माझ्या जेवणात काहीतरी मिसळणाऱ्या मुलाची ओळख मला पटली आहे. पोलिसांना मी सर्व काही सांगितले. मला सीसीटीव्ही फुटेज देण्यास टाळाटाळ करणारे अधिकारीदेखील यात सामील असल्याची दाट शंका येते.’
नरसिंगने कुणाचेही नाव सांगितले नाही; मात्र कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषणसिंग यांनी मीडियाशी बोलताना नावांचा खुलासा केला. ते म्हणाले,‘७५ किलो गटात खेळणारा जीतेश याच्यावर मला शंका आहे. त्याच्यासोबत सुमित हादेखील
असावा. दोघेही छत्रसाल आखाड्यात राहतात. त्यापैकी एकाने नरसिंगच्या जेवणात काहीतरी मिसळल्याची कबुली दिली आहे. त्यांनी स्वत: केले की कुणाच्या सांगण्यावरून केले हे मी सांगू शकत नाही. नरसिंगच्या मागणीनुसार सीबीआयनेच याचा तपास करावा.’
दुसरीकडे क्रीडामंत्री विजय गोयल यांनी नरसिंगच्या रिओमधील सहभागाचा निर्णय आंतरराष्ट्रीय नियमाच्या आधारे होणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘फूड सप्लिमेंटमध्ये काही निष्पन्न झाले नाही तर डोप टेस्ट पॉझिटिव्ह मानली जाईल. नरसिंगला सोनिपतमध्ये सराव करू नको असे सांगण्यात आले होते. आॅलिम्पिकला जाणाऱ्या सर्वच खेळाडूंना त्यांच्या सोयीनुसार सरावाचा पर्याय देण्यात आला होता. पण आता वाद संपायला हवा. नाडाने अहवाल दिला आहे. यानंतरही काही कट असेल तर तपास करू.’
(वृत्तसंस्था)

पोलिसांची चौकशी सुरू
राई पोलीस ठाण्याच्या (सोनिपत) अधिकाऱ्यांनी नरसिंगने दिलेल्या तक्रारीनुसार अमली पदार्थ जेवणात मिसळणे (कलम ३२८) आणि षड्यंत्र रचणे (कलम १२० बी)अंतर्गत गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे.

नाडापुढे नरसिंगची सुनावणी पूर्ण, आज निर्णय
नरसिंग यादव आॅलिम्पिकसाठी जाणार की नाही, याचा निर्णय आज गुरुवारी होणार आहे. राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (नाडा) डोप प्रकरणाची सुनावणी बुधवारी पूर्ण केली. दरम्यान, नरसिंग दुसऱ्या डोप चाचणीतही (ब नमुना) अपयशी ठरला आहे.
साडेतीन तास चाललेल्या सुनावणीदरम्यान नरसिंग आणि त्याच्या अनेक वकिलांनी नाडा पॅनलपुढे बाजू मांडली. या वेळी बाहेर नरसिंगचे चाहते त्याला रिओला पाठविण्याची मागणी करणाऱ्या घोषणा देत होते. नाडा पॅनलने आमची बाजू ऐकून घेतली. सकारात्मक निकाल येण्याची आशा असल्याचे नरसिंगचे वकील विदुषपत सिंघानिया यांनी पत्रकारांना सांगितले.

कटाची शंका : फडणवीस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरसिंगला खोट्या आरोपात गुंतविण्यात आल्याचा संशय व्यक्त केला. केंद्रीय क्रीडामंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात फडणवीस यांनी महाराष्ट्राचा मल्ल नरसिंग हा देशात सर्वाधिक यशस्वी तसेच पुरस्कारविजेता मल्ल असल्याने डोप टेस्टमध्ये पॉझिटिव्ह असल्याचे कळताच धक्का बसला. आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार सराव करणाऱ्या या मल्लाविरुद्ध काही कट रचण्यात आला काय, याची सखोल चौकशी करावी. वैज्ञानिक पद्धतीनुसार चाचणीचा फेरआढावा घेऊन हा कटाचा भाग होता काय, हे शोधून काढावे, अशी विनंती केली आहे.

कोण आहे
प्रवीण राणा?
प्रवीण राणा हा ७४ किलो फ्रीस्टाईल प्रकारातील मल्ल आहे. राणाने २०१४मध्ये अमेरिकेच्या डेव्ह शूल्ट्झ मेमोरियल चॅम्पियनशिपमध्ये ७४ किलोगटात सुवर्णपदक जिंकले आहे. राणाचा रिओ प्रवेश नरसिंगला स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करण्यावर विसंबून असेल. त्यासाठी नरसिंगला शिस्तपालन समितीपुढे हजर व्हावे लागेल.

नरसिंग दुसऱ्या चाचणीतही ‘फेल’
५ जुलै रोजी झालेल्या दुसऱ्या चाचणीतही (ब नमुना)नरसिंग फेल झाला आहे. त्याआधी २६ जून रोजी घेण्यात आलेल्या पहिल्या चाचणीत (अ नमुना) फेल होताच त्याचे निलंबन करण्यात आले होते. प्रतिबंधित अ‍ॅनाबॉलिक स्टेरॉईड मेथाडिएनोन हे औषध नरसिंगच्या शरीरात आढळले होते.

माझा मुलगा
निर्दोष : भुलनादेवी
नरसिंग हा निर्दोष असल्याची भावना त्याची आई भुलनादेवी यांनी बुधवारी व्यक्त केली. कुणी तरी त्याच्याविरुद्ध कट रचला असल्याचे सांगून भुलनादेवी म्हणाल्या, ‘‘२६ वर्षांच्या नरसिंगला रिओमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळायला हवी.’’

नाडाचा अहवाल आल्यानंतरच कारवाई : क्रीडामंत्री
भारतीय कुस्तीपटू नरसिंग यादव डोपिंग चाचणीत अपयशी ठरल्याप्रकरणी राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थे(नाडा)च्या समितीचा अहवाल आल्यानंतरच यावर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टीकरण क्रीडामंत्री विजय गोयल यांनी लोकसभेत दिले. या प्रकरणातील भारतीय कुस्ती संघटनेच्या भूमिकेच्याही चौकशीची मागणी या वेळी लोकसभेत करण्यात आली.

आमच्या वकिलांनी नाडाच्या पॅनेलसमोर नरसिंगची बाजू भक्कमपणे मांडली आहे. आम्ही या सुनावणीवर संतुष्ट आहोत. ६०० पानांचे शपथपत्र आम्ही सादर केले आहे. पॅनेलने आमच्या वकिलांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले आहे. - डब्ल्यूएफआय

Web Title: Rana to take place of Narang?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.