रांचीतील परिस्थिती खूप कठीण : पीटर हँड्सकोंब
By admin | Published: March 23, 2017 12:18 AM2017-03-23T00:18:32+5:302017-03-23T00:18:32+5:30
भारताविरुद्ध तिसरी कसोटी अनिर्णीत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आॅस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज पीटर हँड्सकोंबने
धरमशाला : भारताविरुद्ध तिसरी कसोटी अनिर्णीत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आॅस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज पीटर हँड्सकोंबने आतापर्यंत जेथे खेळलो त्यात रांची येथील परिस्थिती खूप कठीण होती, असे सांगितले. या कसोटीत पीटर हँड्सकोंबने नाबाद ७२ धावांची खेळी केली होती.
अंतिम दिवशी २ बाद २३ या धावसंख्येवरून प्रारंभ करणाऱ्या आॅस्ट्रेलियाला डावाने पराभव टाळण्यासाठी १२९ धावांची गरज होती. आॅस्ट्रेलियन संघाने सकाळच्या सत्रात आणखी दोन फलंदाज गमावले होते; परंतु तरीदेखील ते पीटर हँड्सकोंब आणि शॉन मार्श (५३) यांच्या शानदार भागीदारीने सामना अनिर्णीत ठेवण्यात यश मिळवू शकले.
हँड्सकोंबने म्हटले, ‘‘मी जेथेही खेळलो तेथे रांचीत निश्चितरित्या परिस्थिती खडतर होती. जगातील दोन सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांसमोर पाचव्या दिवशी खेळपट्टीवर खेळणे निश्चितच कठीण होते आणि मी आणि मार्शने सुरेखरित्या संघाला संकटातून बाहेर काढले. विशेषत: शॉन. त्याने स्वत: जास्त वेळ रवींद्र जडेजाच्या उजव्या यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूंचा सामना केला तो अविश्वसनीय होता. कारण या गोलंदाजाविरुद्ध एवढ्या प्रदीर्घ वेळेपर्यंत फलंदाजी करणे सुरेख होते.’’
शाब्दिक हल्ल्यामागे मालिका गमावण्याची भीती : मिशेल स्टार्क
मेलबोर्न : दौऱ्याच्या सलामीला पुण्याचा पराभव भारतीय संघाच्या जिव्हारी लागताच बचावात्मक पवित्रा घेतला. शाब्दिक हल्ल्यामागे मालिका गमावण्याचीच भीती असल्याचा आरोप जखमी वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याने केला. पायाला स्ट्रेस फ्रॅक्चर होताच दौरा सोडून स्टार्क मायदेशी परतला आहे.
तो म्हणाला, ‘‘आमच्या संघाच्या तुलनेत प्रतिस्पर्धी संघाने शाब्दिक हल्ल्याला बळ दिले. आम्ही आधीसारखेच क्रिकेट खेळत आहोत. भारतीय संघाला सुरुवातीला आमच्या तुलनेत वरचढ समजण्यात आले. पुण्यात पहिल्याच सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने भारत बॅकफूटवर आला होता. भारतात आम्ही भारताला पराभूत केल्यामुळे यजमान संघात भीती पसरली. त्यातच शाब्दिक हल्ले करणे बचावात्मक धोरण होते. दुसऱ्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवून मालिका बरोबरीत आणली, हा भाग वेगळा.’’ आॅस्ट्रेलियन मीडियाने काल विराट कोहलीची तुलना डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी करून मैदानाच्या आत तसेच बाहेरच्या आगीत तेल ओतले. (वृत्तसंस्था)
०००