राणी रामपालची ‘खेलरत्न’साठी शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 04:50 AM2020-06-03T04:50:22+5:302020-06-03T04:50:29+5:30
हॉकी इंडिया : अर्जुन पुरस्कारासाठी वंदना, मोनिका, हरमनप्रीत यांची नावे
नवी दिल्ली : यशस्वी खेळाडू आणि भारतीय संघाची कर्णधार राणी रामपाल हिच्या नावाची शिफारस हॉकी इंडियाने प्रतिष्ठेच्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कारासाठी केली आहे. याशिवाय अर्जुन पुरस्कारासाठी वंदना कटारिया, मोनिका आणि पुरुष हॉकी संघातील आघाडीचा खेळाडू हरमनप्रीत यांची नावे पाठवली.
मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी माजी खेळाडू आर. पी. सिंग आणि तुषार खांडकर यांची नावे पाठविण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. सोबतच कोच बी. जे. करियप्पा आणि रमेश पठानिया या दोघांची नावे द्रोणाचार्य पुरस्कारासाठी पुढे केली. क्रीडा क्षेत्रात सर्वोच्च असलेल्या खेलरत्नसाठी १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१९ यादरम्यानची कामगिरी विचारात घेतली जाईल. राणीच्या नेतृत्वात २०१७ ला महिला संघाने आशिया चषक जिंकला. २०१८ च्या आशियाडमध्ये रौप्य पदक जिंकले तसेच एफआयएच आॅलिम्पिक पात्रता सामन्यात २०१९ ला विजयी गोल नोंदवून टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठून दिली.
राणीच्या नेतृत्वात भारतीय संघ एफआयएच रॅकिंगमध्ये नवव्या स्थानी पोहोचला. विश्व अॅथ्लीट पुरस्कार जिंकणाऱ्या राणीला २०१६ ला अर्जुन आणि २०२० ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०० हून अधिक सामने खेळलेली वंदना, १५० हून अधिक सामने खेळणारी मोनिका तसेच पुरुष हॉकी संघाचा ड्रगफ्लिकर हरमनप्रीत यांची नावे अर्जन पुरस्कारासाठी पाठविण्यात आली. हरमन याने ओडिशा येथे एफआयएच सिरीज आॅलिम्पिक टेस्ट स्पर्धेत मनप्रीतऐवजी देशाचे नेतृत्व केले होते. हॉकीमध्ये याआधी सरदारसिंग याला खेलरत्न देऊन सन्मानित करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)