रणजी चॅम्प गुजरातचा सामना शेष भारताशी
By admin | Published: January 20, 2017 05:28 AM2017-01-20T05:28:55+5:302017-01-20T05:28:55+5:30
नवीन रणजी चॅम्पियन गुजरातचा सामना आज, शुक्रवारपासून येथे ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू होणाऱ्या इराणी करंडक क्रिकेट सामन्यात शेष भारताशी होणार
मुंबई : नवीन रणजी चॅम्पियन गुजरातचा सामना आज, शुक्रवारपासून येथे ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू होणाऱ्या इराणी करंडक क्रिकेट सामन्यात शेष भारताशी होणार आहे. या दोन प्रतिस्पर्ध्यांतील चुरशीच्या लढतीची पर्वणी क्रिकेट रसिकांना मिळणार आहे.
या लढतीत भारतीय संघाच्या निवडीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या खेळाडूंना निवड समितीचे लक्ष आकर्षून घेण्याची ही संधी असेल. कारण भारताला नजीकच्या भविष्यात पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. तथापि, सध्या तरी भारतीय कसोटी संघात जागा रिक्त नाही; परंतु इराणी करंडकमध्ये चांगली कामगिरी करून भविष्यात संधी निर्माण करण्याची खेळाडूंना संधी असेल. गुजरातला रणजी करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या पार्थिव पटेलला रिद्धिमान साहा याच्यापेक्षा सरस यष्टिरक्षक फलंदाज म्हणून सिद्ध करण्याची ही एक सुवर्णसंधी असेल. तथापि, पार्थिव मात्र त्याच्यात व साहा याच्यात स्पर्धा मानत नाही.
पार्थिव म्हणाला, ‘हा सामना दोन खेळाडूंत नसून, गुजरात आणि शेष भारत यांच्यात आहे.’ तमिळनाडूला उपांत्य फेरीत पोहोचविण्यात योगदान देणाऱ्या अभिनव मुकुंद याच्याजवळ त्याची उपयुक्तता सिद्ध करण्याची संधी असेल. निवड समितीचे लक्ष मुंबईचा अखिल हेरवाडकर आणि गुजरातचा सलामीवीर प्रियांक पांचाल यांच्यावरही असेल. या दोघांनी १० सामन्यांत १,३00 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या नेतृत्वाखाली शेष भारताचा संघ कागदावर तरी तुल्यबळ दिसत आहे.
त्यांच्याकडे करुण नायरसारखा फलंदाज आहे. नायरने चेन्नईत इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत त्रिशतक ठोकले होते. मधल्या फळीत मनोज तिवारी व साहा आहेत. सीनिअर वेगवान गोलंदाज पंकज सिंह, सिद्धार्थ कौल, सिराज आणि विग्नेश यांच्यावर वेगवान गोलंदाजीची मदार असेल, तर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी कुलदीप यादव आणि शाहबाज नदीमवर असेल.
प्रतिस्पर्धी संघ (शेष भारत) : चेतेश्वर पुजारा (कर्णधार), अभिनव मुकुंद, अखिल हेरवाडकर, करुण नायर, मनोज तिवारी, रिद्धमान साहा, कुलदीप यादव, शाहबाज नदीम, पंकज सिंह, के. विग्नेश, सिद्धार्थ कौल, मोहम्मद सिराज, अक्षय वखारे, ईशान किशन, प्रशांत चोपडा. गुजरात : पार्थिव पटेल (कर्णधार), समित गोहील, प्रियांक पांचाल, हेत पटेल, राहुल भट, मनप्रीत जुनेजा, चिराग गांधी, रुष कलारिया, मोहित थडानी, करण पटेल, हार्दिक पटेल, चिंतन गाजा, ध्रुव रावल, आर. पी. सिंग, ईश्वर चौधरी.