रणजीतील अनुभवाने आत्मविश्वास उंचावला : श्रेयंस
By admin | Published: May 13, 2015 11:18 PM2015-05-13T23:18:17+5:302015-05-13T23:18:17+5:30
चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शानदार कामगिरी करणारा दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सलामीवीर फलंदाज श्रेयस अय्यर याने रणजी करंडक स्पर्धेतील
रायपूर : चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शानदार कामगिरी करणारा दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सलामीवीर फलंदाज श्रेयस अय्यर याने रणजी करंडक स्पर्धेतील अनुभवामुळे इंडियन प्रिमीयर लीगमध्ये त्याचा आत्मविश्वास उंचावल्याचे म्हटले आहे.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रेयस अय्यरने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध ७० धावांची खेळी केली. त्याच्या आणि गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीमुळे दिल्लीने चेन्नईला ६ गडी राखून पराभूत केले होते.
अय्यर म्हणाला, ‘‘रणजी करंडक खेळल्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला. आयपीएलच्या माझ्या पहिल्या पर्वात इतक्या धावा करू शकू, असे मला कधीही वाटले नव्हते. मला रणजीतून मिळालेल्या आत्मविश्वासाचा लाभ झाला. आयपीएलमध्ये लोक माझ्याकडे कसे पाहतील, याचा माझ्या डोक्यात विचार नव्हता; परंतु सामन्यागणिक अखेरपर्यंत चांगले खेळत राहणे, हे माझे लक्ष्य होते. आम्ही पात्र ठरलो नाही. त्यामुळे अखेरच्या सामन्यातही चांगले खेळायचे, याचा निर्धार मी केला. भविष्यापेक्षा वर्तमानात विचार करणे, मला आवडते.’’
चेन्नईविरुद्ध संघ दबावात नव्हता आणि प्लेआॅफ शर्यतीतून बाहेर झाल्यानंतर विजयाने निरोप घेण्याची संघाची इच्छा असल्याचेही तो म्हणतो.
स्पर्धेतील उर्वरित सामना जिंकले, तर चांगले वाटेल. पुढील वर्षासाठी त्यामुळे संघाचा आत्मविश्वास दुणावेल, असे त्याने सांगितले. (वृत्तसंस्था)