रणजी सामन्यांचे आयोजन तटस्थ स्थळी
By admin | Published: May 30, 2016 02:49 AM2016-05-30T02:49:16+5:302016-05-30T02:51:52+5:30
बीसीसीआयच्या तांत्रिक समितीने आगामी सत्रात सर्व रणजी सामन्यांचे आयोजन तटस्थ स्थळावर करण्याचा निर्णय घेतला
बंगळुरू : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयच्या तांत्रिक समितीने आगामी सत्रात सर्व रणजी सामन्यांचे आयोजन तटस्थ स्थळावर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे दुलीप करंडक स्पर्धेचे आयोजन आंतरविभागीय पातळीवर न करता निवड समितीतर्फे अखिल भारतीय पातळीवर निवड करण्यात आलेल्या चार संघांदरम्यान करण्याचे निश्चित झाले आहे. बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के उपस्थित होते.
बीसीसीआयने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले की, ‘समितीने २०१६-१७ या मोसमात आयोजित होणाऱ्या दुलीप करंडक स्पर्धेच्या आयोजनावर चर्चा केली. निवड समिती राऊंड रॉबिन पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेसाठी चार संघाची निवड करेल. स्पर्धेतील सामने दिवस-रात्र कालावधीत आयोजित करण्यात येतील.’
भारतीय संघ न्यूझीलंड, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात जवळजवळ १३ कसोटी सामने खेळणार आहे. कसोटीत खेळणारे सर्व संभाव्य खेळाडू व युवा खेळाडूंना गुलाबी चेंडूंनी खेळण्याची संधी मिळावी, असा प्रस्ताव ठाकूर यांनी ठेवला.
तांत्रिक समितीच्या एका सदस्याने सांगितले की,‘अध्यक्षांना वाटते की, चॅलेंजर ट्रॉफीप्रमाणे यंदाच्या मोसमात सर्व दिग्गज खेळाडूंना व कसोटी संघातील संभाव्य खेळाडूंना कृत्रिम प्रकाशझोतात गुलाबी चेंडूने खेळण्याची संधी मिळायला पाहिजे, त्यामुळे या वेळी विभागीय पद्धतीने स्पर्धा होणार नाही.’
सौरव गांगुलीने दुलीप करंडक स्पर्धेत विदेशी संघांना खेळविण्याची सूचना केली होती, पण त्याबाबत निर्णय झाला नाही.
सूत्राने सांगितले की, ‘गांगुलीच्या प्रस्तावावर विचार करण्यात आला, पण निर्णय झाला नाही. कारण जर आॅस्ट्रेलियाच्या प्रथम श्रेणी संघाला आमंत्रित केले आणि हा संघ बाद फेरीच्या या स्पर्धेत पहिल्याच लढतीत पराभूत झाला, तर त्यांना आमंत्रित करण्याचा उद्देश पूर्ण होणार नाही.’
सर्व सामने कुकाबुरा चेंडूने खेळविण्यात येणार असल्याची चर्चा असून, दिवस-रात्रीच्या सामन्यांसाठी गुलाबी चेंडू तयार करण्यासाठी क्रीडासाहित्य निर्माण करणाऱ्या काही कंपन्यांसोबत बातचीत सुरू आहे. या व्यतिरिक्त रणजी सामने तटस्थ स्थळावर आयोजित करण्याचा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. (वृत्तसंस्था)
>बीसीसीआयने स्पष्ट केले की, ‘स्थानिक क्रिकेटमध्ये स्पर्धा असावी यासाठी स्थानिक संघ गृहमैदानावर संघाला अनुकूल खेळपट्ट्या तयार करतात. हा मुद्दा निकाली काढण्यासाठी बीसीसीआयच्या तांत्रिक समितीने रणजी सामने तटस्थ स्थळावर आयोजित करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे स्पर्धेची रंगत वाढण्यास मदत होईल.’
सूत्रांनी सांगितले की, काही सदस्य नाणेफेक न घेण्याच्या नव्या प्रणालीचा वापर करण्यास उत्सुक आहेत. याचा वापर या वेळी इंग्लिश कौंटी स्पर्धेत करण्यात आला. त्यात पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी स्वीकारण्याचा पर्याय देण्यात येतो, यावर बैठकीत चर्चा झाली. अखेर सामन्यांचे आयोजन तटस्थ स्थळावर करण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला.