बॉक्सिंगमध्ये आता ‘रँकिंग’
By admin | Published: January 9, 2015 01:32 AM2015-01-09T01:32:38+5:302015-01-09T01:32:38+5:30
क्रिकेट, हॉकी, टेनिस व फुटबॉल या खेळांच्या लीग यशस्वी आणि लोकप्रिय ठरल्यामुळे नव्यानेच मान्यता मिळालेल्या बॉक्सिंग इंडियाने बॉक्सिंग लीग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर : क्रिकेट, हॉकी, टेनिस व फुटबॉल या खेळांच्या लीग यशस्वी आणि लोकप्रिय ठरल्यामुळे नव्यानेच मान्यता मिळालेल्या बॉक्सिंग इंडियाने बॉक्सिंग लीग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय बॉक्सिंगमध्ये आमूलाग्र बदल करण्याचे उद्दिष्ट बाळगून या खेळाच्या विकासासाठी काही कठोर निर्णय घेण्याचे संकेतही दिले. देशांतर्गत स्पर्धेत रँकिंग पद्धत आणण्याचा निर्णय झाल्याने विविध कारणांनी स्पर्धेकडे पाठ फिरविणाऱ्या स्टारना रँकिंग गुण मिळविण्यासाठी खेळावेच लागेल.
बॉक्सिंग इंडियाच्या यजमानपदाखाली नागपुरात गुरुवारपासून सुरू झालेल्या एलिट गटाच्या राष्ट्रीय पुरुष बॉक्सिंग स्पर्धेनिमित्त संदीप जाजोदिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संघटनेच्या कार्यकारिणीत काही ऐतिहासिक निर्णय झाले. यामध्ये बॉक्सिंगला व्यावसायिक लुक देण्यासाठी लीग सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने वर्ल्ड सिरीज सुरू केली. याच धर्तीवर भारतीय लीग असेल, अशी माहिती बॉक्सिंग इंडियाचे महासचिव जय कवळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘‘भारतीय बॉक्सिंगमध्ये आतापर्यंत कुठलीही रँकिंग पद्धत नव्हती. त्यामुळे झोनल आणि राष्ट्रीय स्पर्धेकडे स्टार बॉक्सर पाठ फिरवायचे; पण आता रँकिंग पद्धत आणण्याचा संघटनेने निर्णय घेतला आहे. त्यामुळे रँकिंगसाठी खेळावेच लागेल. फिटनेसशिवाय इतर कुठलेही कारण देत स्पर्धा टाळता येणार नाही. स्पर्धेत रँकिंग पद्धती असल्यामुळे नव्या दमाच्या उदयोन्मुख बॉक्सरना टॉप बॉक्सरविरुद्ध लढत देण्याची संधी उपलब्ध होईल. आमचा हेतू हाच आहे.’’
देशात बॉक्सिंगची स्थिती फारशी चांगली नाही. प्रतिष्ठा आणि पैसा दोहोंची भर त्यात पडावी, हा हेतू डोळ्यांपुढे ठेवून आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे उपाध्यक्ष उदित सेठ म्हणाले.
(क्रीडा प्रतिनिधी)
आयओएची मान्यता मिळविण्याचे प्रयत्न
बॉक्सिंग इंडियाला केंद्र शासनाने मान्यता दिली; पण भारतीय आॅलिम्पिक संघटनेने मान्यता देण्यास चक्क नकार दिला आहे. अशा वेळी केरळमध्ये आयोजित नॅशनल गेम्समध्ये बॉक्सिंगपटूंच्या सहभागावर प्रश्नचिन्ह आहे. यावर कवळी म्हणाले, ‘‘बॉक्सिंग इंडियाची आयओएसोबत मान्यतेसाठी झुंज सुरूच आहे. लवकरच यावर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे.