रोअरिंग लायन्स संघाचा दमदार विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:38 AM2017-07-31T02:38:52+5:302017-07-31T02:38:52+5:30
रोअरिंग लायन्स आणि रॅगिंग बुल्स या संघांनी आपआपल्या सामन्यात सहज बाजी मारताना मुंबई ओपन ज्युनिअर टेनिस लीग स्पर्धेच्या दुस-या दिवशी विजयी कूच केली.
मुंबई : रोअरिंग लायन्स आणि रॅगिंग बुल्स या संघांनी आपआपल्या सामन्यात सहज बाजी मारताना मुंबई ओपन ज्युनिअर टेनिस लीग स्पर्धेच्या दुस-या दिवशी विजयी कूच केली. अन्य सामन्यात फ्लाइंग हॉक्स आणि ग्रिझली बेअर्स या संघांनीही विजयी आगेकूच केली.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) वतीने सुरु असलेल्या या स्पर्धेत रोअरिंग लायन्सने दणदणीत विजय मिळवताना डेडली शाकर््सचा ३४-२८ असा पराभव केला. इशान संपत आणि उर्वी काते यांनी आपआपल्या एकेरी लढती मोठ्या फरकाने जिंकताना लायन्सला आघाडीवर नेले. यानंतर शाकर््सच्या वेद ठाकूरने युवराज आनंदचा ६-१ असा फडशा पाडून संघाला पुनरागमन करुन दिले. १२ वर्षांखालील मुलींच्या सामन्यात लायन्सच्या अस्मी कोळीने शाकर््सच्या डेनिकाचा ६-४ असा पराभव केला.
तसेच, मुलांच्या १४ वर्षांखालील सामन्यात आयुष हिंदळेकरने शाकर््ससाठी महत्त्वपुर्ण कामगिरी करताना लायन्सच्या आर्यन कुरेशीला ६-४ असे नमवले. परंतु, मुलींच्या १४ वर्षांखालील सामन्यात खुशी किंजर आणि मिश्र दुहेरीत साहेब सोढी आणि खुशी यांनी बाजी मारली आणि या जोरावर लायन्सने शाकर््सचा पाडाव केला.
दुसरीकडे रॅगिंग बुल्सने जबरदस्त आक्रमक खेळ करताना ग्रोवलिंग टायगर्सचा ३९-१९ असा फडशा पाडला. ओम वर्मा, मारिया वझापल्ली, अझमीर शेख आणि परी चव्हाण या खेळाडूंनी आपआपल्या एकेरीच्या लढती मोठ्या फरकाने जिंकून बुल्स संघाला २०-३ अशी मोठी आघाडी मिळवून दिली. येथेच बुल्सचा विजय जवळपास निश्चित झाला.
टायगर्स संघाच्या करिम खानने संघाला विजय मिळवून देताना मुलांच्या १४ वर्षांखालील गटात रिषभ कौशिकचा ६-१ असा धुव्वा उडवला. विशेष म्हणजे हा टायगर्सचा एकमेव विजय ठरला. यानंतर, मुलांच्या दुहेरीत आणि मिश्र दुहेरीतही बुल्स संघाने बाजी मारत सामना सहज जिंकला.