रेश्माला सुवर्ण, तर सोनालीला रौप्य

By admin | Published: November 6, 2016 02:49 AM2016-11-06T02:49:55+5:302016-11-06T02:49:55+5:30

राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारताने आपले वर्चस्व कायम ठेवत शनिवारी तब्बल १४ पदके जिंकली. यात ग्रीको रोमन शैलीत पाच, महिला फ्रीस्टाईलमध्ये सहा आणि पुरुष फ्रीस्टाईलमध्ये

Rashmala gold, silver of gold and silver | रेश्माला सुवर्ण, तर सोनालीला रौप्य

रेश्माला सुवर्ण, तर सोनालीला रौप्य

Next

सिंगापूर : राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारताने आपले वर्चस्व कायम ठेवत शनिवारी तब्बल १४ पदके जिंकली. यात ग्रीको रोमन शैलीत पाच, महिला फ्रीस्टाईलमध्ये सहा आणि पुरुष फ्रीस्टाईलमध्ये तीन सुवर्णपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत कोल्हापूरची मल्ल रेश्मा माने हिने सुवर्णपदक आणि बीडच्या सोनाली तोडकरने रौप्यपदक पटकावून महाराष्ट्राचा झेंडा उंचावला. मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या उत्कृर्ष काळेने कांस्य पदक जिंकले.
कोल्हापूरची सुवर्णकन्या रेश्मा अनिल माने हिने ६३ किलो वजनी गटात सिंगापूरच्या चरमायनी हुगीटिव्हना आणि भारताच्या गार्गी यादवला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या रेश्माने गेल्या आठवड्यात गोंडा (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक
मिळवून राष्ट्रकुलची दावेदारी सिद्ध केली होती.
मूळची बीडची असलेली व एनआयएस कोच अश्विनी बोराडे यांच्याकडे सराव करणारी मल्ल सोनाली तोडकरने ५८ किलो वजनी गटात आॅस्ट्रेलियन महिला मल्लावर विजय मिळविला; मात्र अंतिम फेरीत तिला भारताच्या मंजूकडून पराभूत होऊन रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिला गटात अन्य लढतीत रितू (४८ किलो), पिंकी (५३ किलो), ललिता (५५ किलो), मंजू (५८ किलो), पिंकी (६९ किलो) यांनी सुवर्णपदके जिंकली. पुरुषांच्या ग्रीको रोमन प्रकारात पाचही वजनी गटांतील सुवर्ण आणि रौप्यपदकांवर भारताने कब्जा केला. ६६ किलो गटात
मनीषने सुवर्णपदक, तर रविंदरने रौप्यपदक पटकाविले.
मुलांच्या ५७ किलो गटात भारताच्या उत्कर्ष काळेला
कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. ८0 किलो गटात हरप्रीत
सिंहने सुवर्ण आणि रविंदर खत्रीने रौप्यपदक मिळविले. ८५ किलो
गटात प्रभपालने सुवर्ण, तर यशपालने रौप्यपदकावर कब्जा केला
आणि १३0 किलो गटात नवीनने सुवर्ण, तर मनवीने रौप्यपदकाला गवसणी घातली.(वृत्तसंस्था)

सोनालीचे वजन ५३ किलो असतानाही मी तिला ५८ किलो गटात खेळविली. तिच्या परिश्रमावर माझा विश्वास होता. राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवून तिने माझा विश्वास सार्थ ठरविला. सोनाली ही गुणी मल्ल असून, ती आॅलिम्पिकमध्ये देशाला निश्चित पदक मिळवून देईल यात शंका नाही.
- अश्विनी बोराडे, एनआयएस कोच.

आजपर्यंत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धांमध्ये चांगले यश मिळाले; पण देशासाठी आॅलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविणे हेच माझे ध्येय आहे. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व कुटुंबीयांच्या पाठबळावर माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लागतील ते कष्ट घेण्याचीही माझी तयारी आहे.
- रेश्मा माने, महिला कुस्तीपटू

रेश्माची ही सुरुवात आहे. लहानपणापासूनच ती माझ्याकडे सराव करीत आहे. तिच्यामध्ये जिद्द आणि चिकाटी आहे. माझ्याकडे जी मुले शिकतात, त्यांनी माझ्यापेक्षाही मोठे व्हावे, हीच माझी पहिल्यापासून इच्छा असते आणि रेश्मा हे करून दाखवीत आहे, याचा मला एक गुरू म्हणून अभिमान आहे.
- राम सारंग,
राष्ट्रकुल सुवर्णपदक
विजेते

Web Title: Rashmala gold, silver of gold and silver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.