रवी शास्त्रींची आता भरत अरुण यांच्यासाठी ‘फिल्डिंग’

By admin | Published: July 14, 2017 12:55 AM2017-07-14T00:55:16+5:302017-07-14T00:55:16+5:30

टीम इंडियाचे नवनियुक्त कोच रवी शास्त्री हे आता स्वत:च्या पसंतीच्या लोकांना सहयोगी स्टाफमध्ये ठेवण्यास आग्रही आहेत.

Ravi Shastri now gets 'fielding' for Bharat Arun | रवी शास्त्रींची आता भरत अरुण यांच्यासाठी ‘फिल्डिंग’

रवी शास्त्रींची आता भरत अरुण यांच्यासाठी ‘फिल्डिंग’

Next

नवी दिल्ली : टीम इंडियाचे नवनियुक्त कोच रवी शास्त्री हे आता स्वत:च्या पसंतीच्या लोकांना सहयोगी स्टाफमध्ये ठेवण्यास आग्रही आहेत. झहीर खान गोलंदाजी कोच असतानादेखील शास्त्रींनी निकटवर्तीय भरत अरुण यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे.
गोलंदाजी कोच म्हणून शास्त्री यांची पसंती अरुण यांनाच होती. पण सीएसीने झहीरच्या नावाला संमती दिली. याचा अर्थ गोलंदाजी कोचची नेमणूक करतेवेळी सीएसीने शास्त्री यांना विश्वासात घेतले नसावे. पूर्णकालीन कोच म्हणून संघाला २५० दिवस देण्याची अट आहे. झहीर इतका वेळ देऊ शकणार नाही, असे कळते. झहीर १०० दिवसांच्या वर उपलब्ध राहणार नाही. इतकेच नव्हे तर झहीरच्या वेतनाचे पॅकेज अद्याप निश्चित झाले नाही.
शास्त्री यांना गोलंदाजी कोचचे नाव विचारले असता त्यांनी अरुण यांचेच नाव घेतले होते. तथापि, सीएसी सदस्य सौरव गांगुली यांनी झहीरचे नाव सुचविले. यावर शास्त्री म्हणाले, ‘मग मला जेसन गिलेस्पी द्या.’ गिलेस्पी हा सध्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजी कोच मानला जातो. गिलेस्पीने आधीच पापुआ न्यूगिनी संघासोबत करार केला असल्याने बीसीसीआय गिलेस्पीचे नाव मान्य करणार नाही, याची जाणीव शास्त्रींना होती. बीसीसीआयने व्यंकटेश प्रसाद यांचे नावदेखील राखीव म्हणून ठेवले होते. शास्त्री मात्र अरुण यांच्याशिवाय अन्य कुणाचे नाव ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हतेच. मागच्या कार्यकाळादरम्यान प्रसाद यांच्याबद्दल काही तक्रारी होत्या. त्यांनी वेगवान गोलंदाजांना मध्यमगती गोलंदाजीकडे वळविल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शास्त्री याच आठवड्यात पदाधिकारी आणि सीओए सदस्यांची भेट घेतील.
शास्त्री हे झहीर खानचा आदर करतात, पण संघासाठी पूर्णकालीन गोलंदाजी कोच असावा, असे त्यांना वाटते. झहीर गोलंदाजांसाठी ‘रोडमॅप’ तयार करेल तर अरुण त्यावर अंमलबजावणी करतील. लंका दौऱ्यासाठी अरुण संघासोबत असावे, हे सांगण्यासाठीच शास्त्रींनी भेटीगाठी सत्र सुरू केले आहे. अरुण यांना स्टाफमध्ये स्थान देण्यात शास्त्री यशस्वी ठरल्यास विरोधी सौरभ गांगुलीवर त्यांचा मोठा विजय ठरणार आहे.
अरुण हे २०१४ पासून गोलंदाजी कोच होते. २०१६ ला शास्त्री यांना बाहेर करेपर्यंत ते संघासोबतच होते. अरुण यांची खेळाडू म्हणून कारकीर्द फारशी गाजली नाही; पण उत्कृष्ट अकादमी कोच म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. वेगवान माऱ्यासंदर्भात त्यांचा चांगला अभ्यास आहे. शास्त्री आणि अरुण हे १९८० च्या दशकात १९ वर्षांखालील संघांपासून घनिष्ट मित्र आहेत. शास्त्री यांच्या शिफारशीवरुन तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी अरुण यांना सिनियर संघाचे गोलंदाजी कोच बनविले. त्या वेळी अरुण हे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गोलंदाजी सल्लागार पदावर कार्यरत होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Ravi Shastri now gets 'fielding' for Bharat Arun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.