रवी शास्त्री देणार भारतीय संघाला पुन्हा "शिकवणी"?
By admin | Published: July 11, 2017 04:46 PM2017-07-11T16:46:05+5:302017-07-11T18:26:49+5:30
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावर माजी संघसंचालक रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावर माजी संघसंचालक रवी शास्त्री यांची निवड करण्यात आल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंसस्थेनं दिलं आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यापासून ते जबाबदारी स्वीकारणार आहेत. आगामी 2019 च्या वर्ल्ड कपपर्यंत त्यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी असेल. भारताचा आगामी श्रीलंका दौरा रवी शास्त्रींसाठी महत्वाचा ठरणार आहे. खासकरुन विराट कोहली आणि संघातील काही खेळाडूंनी शास्त्रींच्या नावाला आपली पसंती दिल्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
काल मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) सदस्यांनी प्रशिक्षकपदाच्या मुलाखती घेतल्या होत्या. यात रवी शास्त्री, विरेंद्र सेहवाग, लालचंद राजपूत, रिचर्ड पायबस आणि टॉम मुडी यांच्या समावश होता. सहावा उमेदवार फील सिमन्स अनुपस्थित राहिला. विराट कोहलीसोबत मतभेद झाल्यानंतर माजी मुख्य प्रशिक्षक व माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे यांनी विंडीजविरुद्धच्या मालिकेपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते.
विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यात उत्तम ताळमेळ असल्याने विराटने रवी शास्त्री भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी असावा, असे मत व्यक्त केले होते. रवी शास्त्री याने याआधी 2014 ते 2016 या काळात भारतीय क्रिकेट संघाचा संघ-संचालक म्हणून काम पाहिले होते. तसेच 2007 साली त्याने काही काळासाठी त्याची भारतीय संघाचा संघ व्यवस्थापक म्हणून सुद्धा काम केले होते.
काल पत्रकार परिषदेत गांगुलीने आम्हाला आणखी वेळ हवा आहे. कोहलीशी चर्चा केल्यानंतरच प्रशिक्षकाची निवड करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र आज सकाळी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या(बीसीसीआय) संचालन समितीचीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सीएसी समितीला आज संध्यकाळी प्रशिक्षकची निवड करण्याचे आदेश दिले होते. क्रिकेट सल्लागार समिती म्हणजे सीएसीमध्ये सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या त्रीमुर्तींचा समावेश आहे.
शास्त्रीने सुरुवातीला या पदासाठी अर्ज केला नव्हता. पण बीसीसीआयने अर्ज स्वीकारण्याची मुदत ९ जुलैपर्यंत वाढविली त्या वेळी माजी कर्णधार शास्त्रीने अर्ज केला होता. शास्त्री यांच्या संचालकपदाच्या कार्यकाळात भारतीय संघाने ५० षटकांच्या विश्वकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती.