रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदासाठी अर्ज
By admin | Published: June 6, 2016 07:34 PM2016-06-06T19:34:52+5:302016-06-06T19:34:52+5:30
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी माजी कप्तान रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) अर्ज केल्याचे सुत्रांकडून समजते.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी माजी कप्तान रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) अर्ज केल्याचे सुत्रांकडून समजते.
गेल्या काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार टीम इंडियाचे संचालकपद सांभाळलेल्या रवी शास्त्री यांनी आता टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठीही अर्ज दाखल केला आहे. रवी शास्त्री यांच्याआधी निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनीही या पदासाठी अर्ज दाखल केला आहे.
बीसीसीआयने बुधवारी संध्याकाळी जाहिरात आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. विशेष म्हणजे यावेळी बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज करताना नऊ प्रमुख अटी देखील टाकल्या आहेत. त्यातील प्रमुख अट अशी आहे की, अर्जदाराने आयसीसी सदस्य राष्ट्रीय संघ, प्रथम श्रेणी क्रिकेट संघ किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही संघाचे यशस्वी प्रशिक्षकपद भूषविले असले पाहिजे. तसेच, इंग्रजी भाषेसह हिंदी आणि इतर भाषा बोलता येणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, यासाठी येत्या 10 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन बीसीसीआयने केले आहे.
टीम इंडियाचे मार्गदर्शन रवि शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर, गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा करार मार्च महिन्यात झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर संपुष्टात आला. दरम्यान, बांगर यांना आगामी झिम्बाब्वे दौ-यासाठी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडले आहे.